वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:03 IST2020-12-11T00:14:43+5:302020-12-11T01:03:23+5:30
सटाणा/जोरण : बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वारंवार गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव व जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांना घेराव घालत नागरिकांनी रुग्णालयासमोरच ठिय्या दिला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्यांना घेराव
सटाणा/जोरण : बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वारंवार गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव व जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांना घेराव घालत नागरिकांनी रुग्णालयासमोरच ठिय्या दिला.
जोरण, किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, मोरकुरे , भिलदर, तळवाडे दिगर आदी गावांचा समावेश आहे. आदी गावातील नागरिक हे नेहमी जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात; मात्र येथील डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील नागरिकांना सुविधाच मिळत नाही. गुरुवारी सकाळी दहा वाजता परिसरातील नागरिकांनी कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहून जे संबंधित डॉक्टरांची पाहणी केली असता, सकाळी अकरा वाजेपर्यंत येथील वैद्यकीय अधिकारी तसेच काही कर्मचारी गैरहजर दिसून आलेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत आहिरराव यांना निवेदन देऊन संबंधित प्रकार उघडकीस आणून दिला व संबंधितांवर कार्यवाहीची मागणी निवेदनात केली.
यावेळी राजेंद्र आहिरे प्रहार जनशक्ती तालुका उपाध्यक्ष, दीपक खरे, प्रहार जनशक्ती तालुका सचिव, मनोहर ठाकरे सरपंच, दीपक काकुळते उपसरपंच, बाळू सोनवणे, सरपंच राहुल खैरनार, उमेश काकुळते, संजय आहिरे, प्रवीण वाघ, राकेश बागुल,कपिल काकुळते, रमेश आहिरे, उमेश जगताप, नितीन काकुळते, नीलेश काकुळते, राहूल काकुळते, कैलास काकुळते,रावसाहेब आहिरे, भिला काकुळते, विक्रम काकुळते, कैलास वाघ, मनोहर सावकार आदी उपस्थित होते. (१० जोरण)
-----------------------
संबंधित गैरहजर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची माहिती मी वरिष्ठ कार्यालय जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवत आहे, तसेच नेहमी मुख्यालयी राहणारे डॉक्टर यांची नियुक्ती करण्यात येणार असून, संबंधित गैरहजर डॉक्टर यांच्यावर कारवाई केली जाईल.
-हेमंत आहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी, सटाणा.
माझ्या वीरगाव गटातील जे संबंधित अधिकारी व कर्मचारी आहेत, त्यांनी कामात काही टाळाटाळ केली व सतत गैरहजर आढळून आल्यास व नागरिकांनी तक्रार केली तर संबंधित कर्मचारी व अधिकारी यांंच्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल.
-साधना गवळी, जि.प.सदस्य, वीरगाव गट.
ग्रामस्थांमध्ये संताप
गेल्या एक-दोन दिवसांपूर्वी बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील अभिमन गंगाधर अहिरे व तसेच किकवारी बुद्रुक येथील शेतकरी काकाजी माला वाघ यांच्यावर मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला; मात्र जमलेल्या नागरिकांनी जवळच असलेले वागदर वस्तीत धाव घेऊन संबंधित नागरिकांना जवळच असलेले कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र रात्रीच्या वेळी कपालेश्वर आरोग्य केंद्रात कुठलाही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.