कहांडळवाडीत १८ कुटूंबांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:42 PM2020-07-01T18:42:03+5:302020-07-01T18:42:30+5:30
सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या कहांडळवाडी गावात सोमवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सदर रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी १८ कुटुंबांचे दैनंदिन सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.
सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या कहांडळवाडी गावात सोमवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सदर रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी १८ कुटुंबांचे दैनंदिन सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.
औरंगाबाद येथील एका वाहन उत्पादक कारखान्यात कामाला असणारा सदर रुग्ण दि. २४ जून रोजी गावी परत आला होता. औरंगाबाद येथील कारखान्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊन करीत व्यवस्थापनाने सर्व कामगारांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे गावी परत आल्यावर सदर रुग्णाने आरोग्य केंद्रात जाऊन स्वत:ची तपासणी करून घेतली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला होम क्वारण्टाइन राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार घराजवळ असलेल्या चाळीतील शेड वजा खोलीतच सदर रुग्ण थांबला होता. मात्र, दोन दिवसांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला सिन्नर येथील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्याच्या थुंकीच्या स्रावांचे नमुने घेतल्यावर पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी सायंकाळी निष्पन्न झाले. गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने कहांडळवाडी येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या पथकाने ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आहे. सदर रुग्ण राहत असलेल्या भागात कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी असणाºया १८ कुटुंबातील ८५ लोकसंख्येचा दैनंदिन सर्वे करण्यात येणार आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींना सिन्नर रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले असून ५ लो रिस्क व्यक्तींना होम क्वारण्टाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वावी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य व त्यांचे सहकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. दरम्यान वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कंटेंटमेंट क्षेत्रात नागरिकांना ये- जा करण्यास मनाई असल्याचे सांगितले.