मनपाकडून ७३२ नागरिकांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:28 PM2020-04-23T22:28:14+5:302020-04-24T00:15:05+5:30
नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरापासून काटेकोर उपाययोजना केल्या आहे. विशेषत: देश-विदेशांतून आलेल्या ७३२ नागरिकांचे सर्र्वेक्षण करून प्रशासनाने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली आहे.
नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरापासून काटेकोर उपाययोजना केल्या आहे. विशेषत: देश-विदेशांतून आलेल्या ७३२ नागरिकांचे सर्र्वेक्षण करून प्रशासनाने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली आहे. यातील ५८३ नागरिकांचा होम क्वारंटाइनचा कलावधी पूर्ण झाला आहे.
उर्वरित नागरिकांवरदेखील विशेष नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई- पुण्याजवळ असूनदेखील नाशिक शहरात संसर्ग नियंत्रित ठेवण्यात नाशिक महापालिकेला मोठे यश मिळाले आहे. कोरोनाचा संसर्ग देशात सुरू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यात देश-विदेशांतून येणाऱ्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणे तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार होम क्वॉरंटाइन ठेवण्याचे निर्देश होते.
महापालिकेने त्यानुसार उपाययोजना करताना विमानतळ तसेच रेल्वे प्रशासनाकडून अलीकडील काळात नागरिक कोठून आले, त्याची माहिती घेतली व त्यांंची आरोग्य तपासणी केली आहे. नाशिकमध्ये अमेरिका, आॅस्ट्रेलिया, दुबई, इटलीसह अन्य देशांतून आलेल्या ३९९ नागरिकांची माहिती घेऊन त्याचे सर्वेक्षण केले. अन्य राज्यांत जाऊन आलेल्या ३३३ नागरिकांसह एकूण ७३२ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. यातील ५८३ नागरिकांचा १४ दिवसांचा होम क्वॉॅरंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे, तर १४९ नागरिक वैद्यकीय पथकांच्या निगराणीखाली आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून आदेश येताच कठोर उपाययोजना राबविल्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात कोरोना नियंत्रणात राहिल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
-------
देश-विदेशांतूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी त्वरित मनपास कळवावे, असे आवाहन करण्यात आले होते किंबहूना कायद्याने ते बंधनकारक करण्यात आले होते. परंतु तसे न कळविल्याने नाशिकमध्ये अशा नागरिकांची प्राथमिक अवस्थेत तपासणी करता आली नाही आणि पुढे तेच बाधित आढळले, असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.