बोरीपाडा, लाडगाव सिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 05:05 PM2019-07-22T17:05:51+5:302019-07-22T17:08:43+5:30
शासनाचा निर्णय : संकल्पन कामासाठी निधी मंजूर
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लघु पाटबंधारे योेजनेतील बोरीपाडा आरि साठवण बंधारा अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील लाडगाव येथील सिंचन क्षमता प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने १८ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यामुळे संकल्पन काम होऊन प्रकल्पाच्या कामांना चालना मिळणार आहे.
राज्य शासनाने १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पांच्या सर्वेक्षणाकरीता सन २०१९-२० मधील अर्थसंकल्पात ८ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार त्यातील ६० टक्के निधी हा वितरणासाठी उपलब्ध झाला आहे. सदर निधी वैधानिक विकास मंडळ निहाय प्रमाणकांच्या मर्यादेपेक्षा वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, उर्वरित महाराष्ट्र विभागातील लघु पाटबंधारे योजनेंर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीपाडा (गोलदरी) आणि साठवण तलाव बंधारा योजनेंतर्गत सुरगाणा तालुक्यातील लाडगाव येथील सिंचन क्षमता प्रकल्पांच्या संकल्पन कामासाठी एकूण १८ लाख १० हजार रुपयांचा निधी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक यांच्याकडे पुढील वितरणासाठी सुपुर्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येकी ९ लाख ५ हजार रुपये प्राप्त होणार आहेत. शासनाने सदर निधी वितरित करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही सिंचन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळणार असून परिसरातील शेती व्यवसायाला बळकटी प्राप्त होणार आहे.