महापालिका करणार मिळकतींचे सर्वेक्षण

By admin | Published: January 23, 2015 11:43 PM2015-01-23T23:43:34+5:302015-01-23T23:45:02+5:30

मनपाचे सॉफ्टवेअर तयार

The survey conducted by municipal corporation | महापालिका करणार मिळकतींचे सर्वेक्षण

महापालिका करणार मिळकतींचे सर्वेक्षण

Next

नाशिक : महापालिकेने घरपट्टी करात सुधारणा न केल्यामुळे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाचा निधी केंद्राने रोखून धरल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने आता सात वर्षांपासून रखडलेल्या मिळकतींचे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याचे ठरविले असून, अत्याधुनिक पद्धतीने होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी लागणारे सॉफ्टवेअरही महापालिकेनेच तयार केले आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेवर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या २० लाखांवर जाऊन पोहोचली तरी पालिकेकडे केवळ ३ लाख ९० हजार मिळकतींची नोंद आहे. शहरात सुमारे साडेचार लाख मिळकती असल्याचा अंदाज आहे. शहरातील मिळकतींची नोंद घेण्यासाठी महापालिकेने सन २००६ मध्ये स्पेक कन्सल्टंट या संस्थेला सर्वेक्षणाचे कंत्राट दिले होते. परंतु सदर संस्थेने अर्धवटच काम सोडून दिल्याने सर्वेक्षण रखडले. त्यानंतर महापालिकेमार्फत फारसे प्रयत्न झाले नाहीत. दरम्यान, जकात जाऊन एलबीटी लागू झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून, महापालिका आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहे. अशावेळी उत्पन्नवाढीसाठी नवनियुक्त आयुक्त डॉ. गेडाम यांनी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेची पत निश्चित करणाऱ्या क्रिसिल या संस्थेनेही घरपट्टी करपद्धतीत सुधारणा करण्याची सूचना केल्यानंतर आयुक्तांनी आता शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, तसे सॉफ्टवेअरही तयार केले आहे. सदर सर्वेक्षण ‘डोअर टू डोअर’ जाऊन होणार असून, जीआयएस मॅपिंगद्वारे शहरातील मिळकती महापालिकेच्या रडारवर येणार आहेत. सर्वेक्षणासाठी सुमारे दीडशे कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, सहा महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेवर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The survey conducted by municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.