जानोरी ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम समितीकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:12 PM2020-01-17T22:12:54+5:302020-01-18T01:08:41+5:30
राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजना २०१९-२० या वर्षातील पुरस्कारासाठी पाहणी समितीने जानोरी ग्रामपंचायतीस भेट देऊन कामकाजाची पाहणी करत समाधान व्यक्त केले.
दिंडोरी : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजना २०१९-२० या वर्षातील पुरस्कारासाठी पाहणी समितीने जानोरी ग्रामपंचायतीस भेट देऊन कामकाजाची पाहणी करत समाधान व्यक्त केले.
सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बी.के. बिन्नर, डी. जे. पवार, सूर्यवंशी आदींच्या समितीने दिंडोरी तालुक्यातील स्मार्ट ग्राम योजनेत भाग घेतलेल्या वणी, खेडगाव व जानोरी या गावांना भेटी देऊन तेथील कामांची पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांचे वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा, प्लॅस्टिकबंदी, गावातील सौर दिवे, जलसंधारणाची कामे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आदी बाबींची या समिती सदस्यांनी पाहणी केली. जानोरी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन दैनंदिन कामकाज, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली ग्रामपंचायतीचे संपूर्ण संगणीकृत कामकाजाची पाहणी केली.
यावेळी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामविकास अधिकारी के.के. पवार यांनी समितीला सर्व योजनांची माहिती दिली. यावेळी दिंडोरी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी जिभाऊ शेवाळे, विस्तार अधिकारी विजय शेवाळे, विस्तार अधिकारी यशपाल ठाकरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.