विल्होळी गावातील भूमापनाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:55 AM2019-07-22T00:55:34+5:302019-07-22T00:56:07+5:30
विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल.
विल्होळी : विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल. ग्रामस्थांना मिळकत पत्रिका व सनद भूमिअभिलेख विभागामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागातर्फे देण्यात आली आहे.
ग्रामस्थांना या सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी गावठाण भूमापन महत्त्व व फायदे ड्रोन सर्व्हे, ड्रोनद्वारे भूमापन याविषयी भूमिलेख विभागाचे अधीक्षक विजय संधानशिव व भास्कर राऊत यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाजीराव गायकवाड होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी बळीराम पगार, रामजी थोरात, सोमनाथ भावनाथ, संपत बोंबले, पोलीसपाटील संजय चव्हाण, धोंडीराम थोरात, जानकाबाई चव्हाण, शोभा वाघ, सुरेश भावनाथ, मनोहर भावनाथ, पुंडलिक सहाने, सूर्यभान बोराडे, मोतीराम भावनाथ, बाजीराव मते, गंगाराम चव्हाण, सुदाम थोरात, पोपट निंबेकर, झुंबर बेंडकोळी, काशीनाथ मते आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वेक्षणाने होतील फायदे
शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होईल.
मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील.
मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत होईल.
मालकी हक्काच्या अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल.
ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होईल.
गावातील रस्ते ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होतील.
मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरांवर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल.
मिळकतींना बाजारपेठांमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल.
ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल.
सर्व कार्यपद्धती पारदर्शकपणे राबविली जाईल.