सोयगावातील बच्छाव सर्कल तीन महिन्यांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 10:44 PM2021-08-29T22:44:09+5:302021-08-29T22:44:52+5:30
सोयगाव : सोयगावातील बच्छाव सर्कल गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात असून पथदीप बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मनपा विद्युत विभागाने वीजपुरवठा सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
सोयगाव : सोयगावातील बच्छाव सर्कल गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात असून पथदीप बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मनपा विद्युत विभागाने वीजपुरवठा सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
या भागात प्रचंड रहदारी असते, चोवीस तास लहान,मोठ्या,अवजड वाहनांची ये-जा ह्याच मार्गाने चालू असते. मागील तीन महिन्यांपासून येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्री येथून वाहतूक करणे जोखमीचे झाले आहे. पथदिव्यांअभावी पादचारी, सायकल चालक एकमेकांवर धडकत आहेत. पंधरा दिवसापूर्वी एका वयोवृद्ध व्यक्तीला सायकल चालकाने मागून धडक दिल्याने त्यांना डोक्याला जखम झाली.
चौकात सर्वत्र मोठेमोठे दगडधोंडे असून रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे. बच्छाव सर्कल दुरूस्ती, सुशोभीकरण व रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरून आहे. भूमिगत गटारीच्या पंधरा फूट खोल चेंबरमध्ये गाय पडली होती. त्यावेळी उपमहापौर आहेर यांनी उद्या लगेच पथदिवे दुरुस्ती करून देतो असे आश्वासन दिले होते.
महिना उलटत आला तरी पथदीप बसले नाहीत. पथदिव्यांअभावी या चौकातून प्रवास करणे अवघड झाले आहे. भूमिगत गटाराचे चेंबर चक्क माती टाकून बुजवण्यात आले आहे. मालेगाव महानगरपालिका नागरी सुरक्षितता याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. जागरूक नगरसेवकांचा अभाव,तत्पर प्रशासकीय अधिकारी नसल्या कारणाने नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी भरूनही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
महानगरपालिकेत जागृत,नागरिकांच्या समस्या जाणून घेणाऱ्या व सोडवणाऱ्या नगरसेवकांचा अभाव आहे. बच्छाव सर्कलची पूर्णपणे वाट लागली आहे.जनतेतून, होणाऱ्या कामांचे पब्लिक ऑडिट होण्याची मागणी जोर धरत आहे.
-पंकज बच्छाव, सोयगाव
बच्छाव सर्कल अर्थात टेहरे चौफुली विकास हा अति महत्त्वाचा विषय आहे. नागरिक मागील तीन महिन्यांपासून पथदिवे लावण्याची मागणी करत आहेत. स्वतः उपमहापौर यांना येथील परिस्थितीची लोकांनी जाणीव करून दिली आहे. तरी चौफुली अंधारातच आहे.
-अमित(सोनू)पाटील.सोयगाव