सराईत गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:28 PM2020-03-24T22:28:49+5:302020-03-25T00:18:24+5:30
वडाळागावातील सराईत गुन्हेगार सागर रामदास शिंदे (२६, रा. महेबूबनगर) याला उपायुक्त विजय खरात यांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
इंदिरानगर : वडाळागावातील सराईत गुन्हेगार सागर रामदास शिंदे (२६, रा. महेबूबनगर) याला उपायुक्त विजय खरात यांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे. सराईत गुन्हेगार शिंदेच्या विरु द्ध विविध पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे जबरी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तडीपार प्रस्तावाची चौकशी पूर्ण करून खरात यांनी दिलेल्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी त्यास वर्षभरासाठी शहरासह जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
पीडित महिलेचा विनयभंग
नाशिक : गांधीनगर येथील पंचशीलनगर परिसरात दोघांनी एका पीडित महिलेला मारहाण करीत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सागर रामा सदावर्ते व त्याच्या साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलास का मारहाण केली, असा जाब पीडितेने संशयितांना विचारला होता, त्याचा राग आल्याने संशयितांनी फिर्यादी महिलेला मारहाण करत विनयभंग केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. ए. परदेशी हे पुढील तपास करीत आहेत.
गंगापूररोडवर महिलेची सोनसाखळी हिसकावली
नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरातील शारदानगर भागात दुचाकीस्वार चोरट्याने वृद्धेची पोत ओरबाडून नेली. सुचेता बळीराम उमर्जीकर (रा. शारदानगर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. सुचेता उमर्जीकर या शुक्र वारी (दि.२०) रात्री आठ वाजेच्या सुमारास पायी जात असताना चोरट्याने त्यांच्या समोरून येत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.
मोरवाडीत फर्निचर दुकाने आगीत भस्मसात
सिडको : मोरवाडी येथील अमरधामसमोर असलेल्या फर्निचर व काचेच्या दुकानांसह पाच दुकानांना पहाटे अचानक भिषण आग लागली. यात अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी चार तासांनंतर आग आटोक्यात आणली. आगीत सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.