सूर्यगडला गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:07 AM2020-04-09T00:07:31+5:302020-04-09T00:08:07+5:30
सूर्यगड येथे धाड टाकून पोलिसांनी गावठी दारु ची हातभट्टी उद्ध्वस्त केली. यावेळी दारूचे शंभराहून अधिक डबेही नष्ट करण्यात आले.
सुरगाणा : येथून जवळच असलेल्या सूर्यगड येथे धाड टाकून पोलिसांनी गावठी दारु ची हातभट्टी उद्ध्वस्त केली. यावेळी दारूचे शंभराहून अधिक डबेही नष्ट करण्यात आले.
कोरोनामुळे लॉकडाउन काळात मद्य विक्रीला शासनाकडून बंदी घालण्यात आली असली. तरीही तालुक्यातील काही जणांनी गावागावात याचा फायदा घेत हातभट्टीची चोरटी विक्र ी सुरू केली आहे. लॉकडाउनमध्ये पोलीस प्रशासन व्यस्त असल्याचे पाहून रात्रीच्यावेळी दारूचा साठा खेड्यापाड्यांत पोहोचविणारे सक्रिय झाले होते. पोलिसांना याची खबर लागताच गावातील तरुणांच्या सहकार्याने सुर्यगड येथे अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाडी घालण्यात आल्या. त्यात मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला. तसेच गावठी हातभट्टी दारूचा १०० डब्बे नष्ट केले. लॉकडाउनचा फायदा घेऊन तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात आहे. त्यामुळे मद्य खरेदीसाठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळेही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे, उपनिरीक्षक सागर नांद्रे, महेश डंबाळे, राहुल जोपळे, इंद्रजित बर्डे, हेमंत भालेराव, प्रभाकर सहारे, यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांनी सूर्यगड गावातीलच ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर राऊत, पोलीस पाटील नरेंद्र चव्हाण, काशीनाथ जाधव, कोतवाल, केशव वार्डे, बेबीबाई बागुल, कुसुमबाई जाधव, भगवान गवळी, भरत जाधव, कांतीलाल गुबाडे, दिनेश गुबाडे, भिका पवार यांच्यासह काही महिलांना विश्वासात घेऊन गावात दारु बंदी करण्याचा निर्णय घेतला. अशा व्यसनांमुळे आपली पिढी, संसार कसा उद्ध्वस्त होत आहे, याची जाणीवही त्यांनी ग्रामस्थांना करु न दिली.