आरोग्य संपन्नतेसाठी सूर्यनमस्काराची साधना
By admin | Published: February 3, 2017 12:54 AM2017-02-03T00:54:38+5:302017-02-03T00:54:49+5:30
तरुणांना प्रोत्साहन : श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्राचा उपक्रम; राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा
मुकुंद बाविस्कर नाशिक
सध्या धावपळीच्या काळातही आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी आबालवृध्द प्रयत्न करत असल्याने शहरातील चौकाचौकात अत्याधुनिक ‘जीम’ सुरू झालेले दिसतात. परंतु प्राचीन भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा असलेल्या ‘सूर्यनमस्कार’ या सोप्या साधनेचा अवलंब केल्यास महागड्या जीममध्ये जाण्याची गरज नाही, असा अनुभव सूर्यनमस्काराचे मार्गदर्शक व साधकांनी व्यक्त केला.
सूर्यनमस्कार हा अत्यंत आरोग्यपूर्ण आणि आरोग्यसंपन्न व्यायाम असून यामुळे शरीर, मन, बुध्दी या तिन्ही स्तरावर चांगला प्रभाव पडतो. सूर्यनमस्कार या प्राचीन भारतीय शक्ती उपासनेचा समर्थ रामदास स्वामींनी आयुष्यभर प्रचार केला. विशेष म्हणजे नाशिकनजीक टाकळी येथेच या योग साधनेचे पुनर्जीवन केले. समर्थांचा हाच वारसा घेऊन श्री सूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्रामार्फत वर्षभर राज्यभरात शालेय विद्यार्थी व तरुणांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धा उपक्रम राबविले जातात. यासंबंधी माहिती देताना केंद्राचे अध्यक्ष सुभाष खर्डेकर यांनी सांगितले की, जागतिक सूर्यनमस्कार दिन आणि रथसप्तमीच्या पार्श्वभूमीवर रामदास स्वामी यांच्या पादुकांचे टाकळी येथे गोदावरी नंदिनी संगमावर पूजन करण्यात येणार आहे.
१६ व्या शतकात याचदिवशी समर्थांनी रथसप्तमीला सूर्यउपासनेच्या तपाला प्रारंभ केला होता. सूर्यउपासना ही कायिक आणि मानसिक दोन प्रकारे असते. कायिक सूर्यनमस्कार म्हणजे सूर्यादयाला सुर्वांगसुंदर असा सूर्यनमस्काराचा व्यायाम किंवा योगा करणे आणि मानसिक सूर्यनमस्कार म्हणजे सूर्यनमस्कार घालत असताना गायत्री मंत्राचा जप करणे होय.
सूर्यनमस्कारामुळे व्यायाम, साधना आणि ब्रह्मकर्म हे तिन्ही प्रकार घडतात. साहजिकच मन, बुध्दी आणि शरीराचा विकास होतो. त्यामुळे जीममध्ये पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. गेल्या सात वर्षांपासून सूर्यनमस्कार साधनेसाठी राज्यभरात प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू आहे.
समर्थ रामदास स्वामी यांच्या मठांमध्ये रत्नागिरी, सज्जनगड, मिरज, चाफळ, जांबसमर्थ आदि ठिकाणी सूर्यनमस्कार शिकण्यामध्ये आबालवृध्दांचा प्रतिसाद लाभला, असेही खर्डेकर यांनी सांगितले. २०११ मध्ये गोदाघाटावर हजारो साधकांच्या उपस्थितीत रथसप्तमीला सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्याची आठवण त्यांनी सांगितली.