नाशिकमध्ये पूलाचे कठडे तोडून सुसाट कार नदीत; एक युवक ठार, दोघे जखमी
By अझहर शेख | Published: July 6, 2024 05:52 PM2024-07-06T17:52:16+5:302024-07-06T17:52:28+5:30
दुगाव चौफुली ओलांडून पुढे महादेवपूरमार्गे गंगापुर गावाकडे येताना तीव्र उतारावरून कापडणीस यांच्या ताब्यातील कार (एम.एच१५ डीएस८०८८) वेगाने खाली आली.
नाशिक : गिरणारे-दुगावमार्गे गंगापुरकडे प्रवास करताना रात्रीच्यावेळी सुसाट कारवरील नियंत्रण सुटल्याने संरक्षक कठडे तोडून कार थेट नदीपात्रात कोसळली. शुक्रवारी (दि.५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये कारचालक नितीन बापू कापडणीस (३०,रा.चांदशी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर किरण संजय कदम (३२,रा.चांदशी), योगेश सुभाष पानसरे (२९ रा.अमृतधाम) हे दोघे युवक जखमी झाल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
दुगाव चौफुली ओलांडून पुढे महादेवपूरमार्गे गंगापुर गावाकडे येताना तीव्र उतारावरून कापडणीस यांच्या ताब्यातील कार (एम.एच१५ डीएस८०८८) वेगाने खाली आली. यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट संरक्षक कठडे तोडून गोदावरी नदीत कोसळली होती. पूलाच्या खाली कार पडल्याने येथून जाणाऱ्या वाहनचालकांच्याही लवकर लक्षात आले नाही. रात्रीची वेळ असल्याने वर्दळही कमी होती. जखमी झालेल्या इसमांकडे मोबाइल नव्हता. त्यांनी उलटलेल्या कारमधून बाहेर पडत मयत कापडणीस यांचा मोबाइल घेत त्यावरून ११२ क्रमांक फिरवून घटनेची माहिती देत मदत मागितली. तत्काळ पोलिसांकडून कॉल झाल्याने तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सत्यजीत आमले व ११२चे पथक घटनास्थळी पोहचले. सुरूवातीला पूलाजवळ काहीही दिसून आले नाही.
इंडिकेटरचे ब्लींकींग नदीपात्रात दिसल्यानंतर व जखमींचा आवाज आल्याने पोलिसांनी खाली बघितले असता अपघात झाल्याची खात्री पटली. त्वरित स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. घटनास्थळी रूग्णवाहिकाही तोपर्यंत पोहचली होती. दोघांना रूग्णवाहिकेतून नाशिकला हलविण्यात आले. कदम हा कॉलेजरोडवरील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत तर योगेशला कमी मार लागल्याने तो रूग्णालयात दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलिस करत आहेत.