बालनाट्याची मुहूर्तमेढ राेवणाऱ्या शिक्षिका सुषमा अभ्यंकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:38+5:302021-07-31T04:15:38+5:30
नाशिक : नाशिकमधील बालनाट्याच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लेखिका आणि प्रख्यात मराठी शिक्षिका सुषमा अभ्यंकर (९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...
नाशिक : नाशिकमधील बालनाट्याच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लेखिका आणि प्रख्यात मराठी शिक्षिका सुषमा अभ्यंकर (९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रभक्ती जागृतीसाठी होणाऱ्या मेळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या सुषमाताई यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात लोकहितवादी मंडळाच्या अनेक नाटकांमधून कामे केली. या निमित्ताने त्यांना बालगंधर्वांचा काही काळ सहवास लाभला होता. त्यानंतरच्या काळात एसटी महामंडळातर्फे सादर झालेली संगीत नाटके तसेच नॉव्हेल्टी ड्रामास्टिक्स आणि नाट्य नम्रता या संस्थांतर्फे त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेच्या नाटकांमधूनही भूमिका केल्या. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेली ‘विनायक दामोदर सावरकर’ ही मालिका तसेच ‘कथास्तु’ मालिकेत त्यांनी अभिनय केला होता. बालनाट्य हा त्यांचा विशेष आस्थेचा विषय असल्याने कुमुदताई अभ्यंकर यांच्यासह त्यांनी सदाफुली या बालनाट्य संस्थेची स्थापना करून मुलांची अनेक नाटके रंगभूमीवर आणली. या संस्थेसाठीच त्यांनी लिहिलेल्या बालनाट्याच्या दोन संहितांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे दोन पुरस्कार मिळाले होते. त्याखेरीज मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या अनेक कथांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ नाट्यसेवेबद्ल नाशिकमध्ये झालेल्या नाट्य संमेलनात संमेलनाध्यक्ष नाना पाटेकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेतर्फे अभिनयाचा राज्य पुरस्कार त्यांना मिळाला होता. दीड दशकापूर्वी पर्यंत देखील नाशिकमधील फ्रावशी अकादमी येथे मराठीच्या तज्ज्ञ शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुषमाताई या अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे आणि वकील ॲड. श्रीकांत अभ्यंकर यांच्या त्या मातोश्री होत.
फोटो
३०अभ्यंकर