गांजा तस्करी प्रकरणी येवला येथील संशयित अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:59+5:302021-07-23T04:10:59+5:30
पंचवटी : दहा दिवसांपूर्वी आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात इनोव्हात आढळलेल्या बेकायदेशीर ६० किलो गांजा प्रकरणी आडगाव पोलिसांनी येवला ...
पंचवटी : दहा दिवसांपूर्वी आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात इनोव्हात आढळलेल्या बेकायदेशीर ६० किलो गांजा प्रकरणी आडगाव पोलिसांनी येवला येथे राहणाऱ्या अझरुद्दीन परवेझ शेख या दुसऱ्या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुख्य सूत्रधाराचे नाव समजले असून सुरुवातीला पोलिसांनी मालेगावच्या नदीम आरिफ कलिम अहमद याला अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथक दहावा मैल परिसरात गस्त घालत असतांना नववा मैल रस्त्यावर इनोव्हात ६० किलो गांजा आढळून आला होता. पोलिसात अज्ञात व्यक्तीवर अमली पदार्थ कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करीत १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तो संशयित मालेगावचा असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठ पोलरस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मालेगाव येथून अहमदला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता येवल्यातील अझरुद्दीन शेखचा सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर शेख नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
--इन्फो--
गांजा तस्करी ग्रामीण भागात जोरात?
आडगाव पोलिसांनी बेकायदेशीर गांजा तस्करी प्रकरणी मालेगाव, येवला येथील संशयितांना अटक केल्याने ग्रामीण भागात गांजा तस्करी जोरात सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड हा देखील ग्रामीण भागात राहणारा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्याने ग्रामीण भागात असलेल्या चांदवड, मनमाड, येवला, चाळीसगाव या भागात गांजा तस्करीची पाळेमुळे पसरल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. ग्रामीण भागात हुक्का पार्लर, मटका, अवैध मद्य विक्री, अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असले तरी याकडे ग्रामीण पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने चर्चा रंगली आहे.