सागवान लाकूड चोरीप्रकरणातील संशयिताचा मारहाणीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 11:44 PM2020-12-09T23:44:51+5:302020-12-10T00:31:15+5:30

सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात सागवान लाकूड चोरीप्रकरणी अटक करून सोडून देण्यात आलेल्या गुजरातमधील युवकाचा मृत्यू महाराष्ट्र वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार मयत युवकाच्या आईने धरमपूर पोलिसांत दिली असून, याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Suspect killed in teak timber theft case | सागवान लाकूड चोरीप्रकरणातील संशयिताचा मारहाणीत मृत्यू

सागवान लाकूड चोरीप्रकरणातील संशयिताचा मारहाणीत मृत्यू

Next
ठळक मुद्देमयताच्या आईची तक्रार : वनकर्मचाऱ्यांवर संशय

सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात सागवान लाकूड चोरीप्रकरणी अटक करून सोडून देण्यात आलेल्या गुजरातमधील युवकाचा मृत्यू महाराष्ट्र वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार मयत युवकाच्या आईने धरमपूर पोलिसांत दिली असून, याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी उंबरठाण वनपरिक्षेत्रातील गुही या वनक्षेत्रातून सागवान लाकडाची तस्करी करताना गुजरातमधील धरमपूर तालुक्यातील जागीर येथील नारंदाभाई इंदूभाई गायकवाड (३१) यास गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी सागवान लाकडाच्या पीकअपसह पकडले होते. त्यानंतर त्यास वनविभागाने वारंवार नोटीस बजावूनही तो हजर होत नव्हता. त्यामुळे दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याच्या गावी जाऊन त्याला घरातून ताब्यात घेतले होते. दि. २४ नोव्हेंबर रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता दि. २६ नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली. यादरम्यान नारंदाभाईस गंभीर स्वरुपाच्या मारहाणीमुळे खूपच त्रास होऊ लागल्याने दि. २८ नोव्हेंबर रोजी धरमपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास दि. ५ डिसेंबर रोजी बलसाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार आई मंगळीबाई गायकवाड यांनी धरमपूर पोलिसांत दाखल केली आहे. मुलाचा मृत्यू वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला की अन्य कारणाने झाला याची सखोल चौकशी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर करून पोलिसांनी न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीत केली आहे.

संशयित गायकवाडने तीन दिवसाच्या वनकोठडीत महाराष्ट्र व गुजरात सीमेलगतच्या अनेक संशयितांची नावे सांगितलेली आहेत. त्यांनीच घातपात केला असण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी संशयितास जामीन मंजूर झाला त्या दिवशी त्याची रितसर वैद्यकीय तपासणी केली होती. वनकोठडीदरम्यान त्याची व्यवस्थित काळजी घेतली आहे. याबाबत न्यायालयाने संशयितास सुनावणीदरम्यान विचारणादेखील केली होती.
- संदीप जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, उंबरठाण

Web Title: Suspect killed in teak timber theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.