संशयित राहुल जगताप ‘हाजीर हो’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 01:40 AM2022-02-25T01:40:40+5:302022-02-25T01:41:00+5:30
शहरासह जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या नानासाहेब कापडणीस व त्यांचा पुत्र अमित कापडणीस यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल गौतम जगताप याची दहा दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी (दि. २५) पूर्ण होत आहे. यामुळे सरकारवाडा पोलिसांकडून त्यास आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. यामुळे या सुनावणीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
नाशिक : शहरासह जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या नानासाहेब कापडणीस व त्यांचा पुत्र अमित कापडणीस यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल गौतम जगताप याची दहा दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी (दि. २५) पूर्ण होत आहे. यामुळे सरकारवाडा पोलिसांकडून त्यास आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. यामुळे या सुनावणीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव नानासाहेब कापडणीस, अमित कापडणीस यांचा गेल्या डिसेंबर महिन्यात आठवडाभराच्या अंतराने शहराबाहेर घेऊन जात खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या हत्याकांडाचा शास्त्रोक्त तपास सरकारवाडा पोलिसांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या चमूने अथक परिश्रम घेत या हत्याकांडाचे विविध पैलू या दहा दिवसांमध्ये उलगडण्यात यश मिळविले आहे. या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार संशयित राहुल यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र तरीदेखील त्याच्यासोबत काही संशयित या हत्याकांडात सहभागाची शक्यता नाकारता येत नाही. या दिशेने तपास सुरू असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यामुळे शुक्रवारी पोलिसांकडून पुन्हा न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या हत्याकांडातील अद्यापही काही गूढ उकलणे शिल्लक आहे. संशयिताने कापडणीस पितापुत्रांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शेअर्सविक्रीच्या माध्यमातून मिळविलेली रोकडपैकी बहुतांश रकमेचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. संशयित राहुल हा नोटा जाळून टाकल्याचे सांगत पोलिसांना हुलकावणी देण्याचा वारंवार प्रयत्न करत असल्याचे बाेलले जात आहे.
--इन्फो-
गोव्याहून आणली चोरीची कार
संशयित राहुल याने सुमारे तीन वर्षांपूर्वी आणलेली राखाडी रंगाची मारुती स्विफ्ट कारदेखील चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयिताने या कारचा शहरात बनावट क्रमांक लावून सर्रास वापर केला. तसेच कापडणीस हत्याकांडातदेखील ही कार वापरली गेली. या कारचा मूळ मालक हा गोव्यात वास्तव्यास असून, त्याने कार चोरी झाल्याची तक्रार तेथील स्थानिक पोलिसांकडेदेखील दिली आहे, अशी माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली.