चांदवड दरोडा प्रकरणातील मृत संशयिताची ओळख पटली , गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 07:02 PM2019-05-07T19:02:37+5:302019-05-07T19:03:35+5:30
चांदवड : येथून जवळ असलेल्या खैसवाडा वस्ती भागात दरोडेखोरांना ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत एका संशयित दरोडेखोराचा मृत्यू झाल्याप्रकरणी चांदवड पोलिसांत अज्ञात इसमाविरु द्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत संशयित दरोडेखोराची ओळख पटली असून अभिमान देवीदास पवार (३४, रा. पाचोड जि. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. मृतदेह नातेवाईकांकडे सूपूर्द करण्यात आला असून अन्य संशयित हे औरगांबाद जिल्ह्यातील असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी वर्तविली.
शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चांदवडच्या खैसवाडा वस्ती भागात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी चार ग्रामस्थांवर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेत ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत एका संशयित दरोडेखोराचा मृत्यू झाला होता. सदर संशयिताचा मृतदेह बाळासाहेब कबाडे यांच्या शेतातील दक्षिण कंपाउंड लगत खड्ड्यात पडलेला आढळून आला होता. याबाबत चांदवड पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता डोक्यात टणक हत्याराने मारल्यामुळे संशयिताचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिल्याने पोलिसांनी अज्ञात इसमाविरु द्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत संशयित दरोडेखोर हा औरगांबाद जिल्ह्यातील पाचोड येथील असून त्यांच्यासोबत असलेले इतरह तिघेही याच ठिकाणचे असण्याची शक्यता आहे. नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संशयीत दरोडेखोराकडे एक आधारकार्ड सापडले असून त्यावर शकील अकबर कुरेशी असे नाव असून तो इस्मालनगर, सिंधपुरा कासगज, उत्तरप्रदेश येथील राहणारा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे लावण्यासाठी मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधिक्षक निलोत्पल , मनमाडच्या सहाय्यक अधिक्षक रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक गुन्हे शाखेचे पथक व चांदवड पोलीसांचे पथक औरगांबादकडे रवाना झाले आहे.