पत्नीच्या प्रियकाराचा खून करणारा फरार संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 07:29 PM2020-01-11T19:29:29+5:302020-01-11T19:31:42+5:30
घटनेच्या दिवसापासून गावित हा फरार होता. गावित हा पुन्हा राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
नाशिक : पाथर्डी गावात तब्बल महिनाभरापूर्वी एका विवाहितेच्या पतीने तिच्या प्रियकराला अनैतिक संबंधाच्या संशयावरून कोयत्याने सपासप वार करून ठार मारल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात फरार असलेला संशयित विठ्ठल गव्हाणे यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली.
पाथर्डी गावातील दाढेगाव रस्त्यावर राहणारे नरपतसिंह गावित याच्यावर संशयित आरोपी गव्हाणे याने कोयत्याने वार करून ठार मारले होते. हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वी या दोघांचे भांडण झाले होते. यामुळे संबंधित घरमालकाने गव्हाणे याच्याकडून घरखाली करून घेतले होते. विठ्ठल याने नरपतसिंग याच्यावर दाढेगाव रस्त्यावर अचानक हल्ला चढवला होता. डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले त्यामुळे गावित यास गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र वैद्यकीय सूत्रांनी तपासून मयत घोषित केले. त्यामुळे इंदिरानगर पोलिसांनी गव्हाणेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवसापासून गावित हा फरार होता. गावित हा पुन्हा राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील सहायक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, दत्तात्रेय पाळदे, संदीप लांडे, जावेद खान यांनी सापळा रचून त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
इंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकापाठोपाठ एक घरफोड्याच्या घटना घडत असून, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या दहा दिवसांत घरफोडीची तिसरी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी या घटनेत सुमारे ५९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
राजीवनगर येथील वात्सल्यधामध्ये राहणारे प्रशांत तिवारी
(४३) हे शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजेच्या सुमारास कामावरून घरी आले असता घराचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. तसेच लाकडी कपाटाचे कुलूप तोडून २५ हजारांची रोख रक्कम, ३४ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकूण जवळपास ६० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात घरफोड्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.