नदीतील मृत मासे बाजारात विक्रीस आणल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:30+5:302021-07-26T04:14:30+5:30
मनोज मालपाणी नाशिकरोड : वालदेवी नदीपात्रावर मृत मासे तरंगत असल्याची बातमी परिसरात पसरताच काहींनी कापड्याच्या साह्याने मासे गोळा करून ...
मनोज मालपाणी
नाशिकरोड : वालदेवी नदीपात्रावर मृत मासे तरंगत असल्याची बातमी परिसरात पसरताच काहींनी कापड्याच्या साह्याने मासे गोळा करून ते मासे बाजारात विक्रीसाठी नेल्याची चर्चा होत आहे. याबाबत कुणीही खात्रीशीर दावा केला नसला तरी हे मासे नागरिकांच्या खाण्यात आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चर्चा दिवसभर परिसरात सुरू होती.
रविवारी सकाळपासून वडनेर कोल्हापूर टाइप बंधाऱ्यापासून देवळाली गाव कोल्हापूर टाइप बंधाऱ्यापर्यंत हजारो मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगत वाहत असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर मासे पाहण्यासाठी नागरिक नदीकाठी जमा होऊ लागले. याच दरम्यान काही स्थानिकांनी साडी तसेच धोतराचे कापड आणून त्यात मासे पकडण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक मासेदेखील पकडल्याचे प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे. हे मासे बाजारात विक्री करण्यासाठी काढण्यात आल्याचे बोलले जात आहे, तर काहींनी मासे घरी घेऊन गेल्याचीही चर्चा होती.
मासे नेमके कोठे नेले याबाबतच स्पष्टता नसली तरी नदीतील मृत मासे कुणाच्याही खाण्यात आल्यास विषबाधा होण्याची शक्यत आहे. नेमकी वस्तुस्थिती समोर आलेली नसल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या संबंधीची चर्चा होत असताना संबंधित स्थानिक हे मच्छीमार असल्याचेही बोलले जात आहे.
वालदेवी नदी प्रदूषणाच्या विळख्यात असून नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठीचे प्रयत्न सुरू झाले असताना प्रदूषण पात्राचा मुद्दा यानिमित्ताने उघड झाला आहे.
--इन्फो--
विषारी पाण्यामुळे मृत्यू
वालदेवी नदीपात्रात दूषित पाणी किंवा काहीतरी विषारी द्रव्यसदृश पदार्थ मिसळल्याने हजारो मासे पाण्यावर मृतावस्थेत तरंगत होते. रविवारी सकाळी आजूबाजूच्या रहिवाशांच्या सदरील बाब लक्षात आली. चेहेडीपासून वडनेरपर्यंत नागरिकांनी एकमेकाला फोन करून माहिती दिली, तर अनेकांनी प्रत्यक्ष जाऊन बघितले असता वडनेर येथील कोल्हापूर टाइप बंधाऱ्याच्या पहिले नदीपात्रातील मासे मृतावस्थेत वाहून येताना दिसले. याबाबत संबंधितांनी लक्ष देऊन या प्रकरणाची माहिती समेार आणावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.