आडगाव पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 04:07 PM2019-12-29T16:07:48+5:302019-12-29T16:11:00+5:30

मृत्यूचे नेमके कारण अद्यापतरी पुढे आलेले नाही. याप्रकरणात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नेमकी काय भूमिका असेल? याकडे आता लक्ष लागले आहे.

Suspected death of female employee at Adgaon police station | आडगाव पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

आडगाव पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्देआत्महत्त्या केल्याचीही चर्चा आडगाव पोलीस ठाण्याच्या वर्तुळात पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर बेशुध्दावस्थेत वरिष्ठ पोलीस निरिक्षकांविरूध्द दिली होती तक्रार

नाशिक : आडगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस मनीषा गोसावी (३५,रा. अयोध्या अपार्टमेंट, जेलरोड) या रविवारी (दि.२९) दुपारी पोलीस ठाण्याकडे येत असताना नांदूरनाका परिसरात बेशुध्दावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. जागरूक नागरिकांनी तत्काळ त्यांना उचलून जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापतरी पुढे आलेले नाही. याप्रकरणात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नेमकी काय भूमिका असेल? याकडे आता लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शहराच्या दौ-यावर प्रथमच येत असताना ही घटना घडल्याने गांभीर्य अधिकच वाढले आहे.
जिल्हा शासकिय रूग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर खरे कारण पुढे येईल; मात्र गोसावी यांनी आत्महत्त्या केल्याचीही चर्चा आडगाव पोलीस ठाण्याच्या वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
आडगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून नोकरीस असलेल्या गोसावी या मागील आठवडाभरापासून रजेवर होत्या. दरम्यान, त्या रविवारी पोलीस ठाण्याकडे येत असताना अचानकपणे रस्त्यालगत दुचाकी उभी करून थांबल्या आणि बेशुध्दावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. नागरिकांनी पोलीस असल्याचे ओळखून तत्काळ त्यांना जवळच्या रूग्णालयात हलविले; मात्र तत्पुर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, महिला पोलीस शिपायाच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे. ही महिला आडगाव पोलीस ठाणे अंकीत नांदूरनाका पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर बेशुध्दावस्थेत नागरिकांना दिसून आली. दरम्यान, याबाबत पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महिला शिपाई या मागील२० तारखेपासून रजेवर होत्या. त्यांनी आठवडाभरापुर्वी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांविरूध्द तक्रारदेखील दिली होती. यामुळे सहायक पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर चौकशी अहवाल माझ्याकडे सोपविला. त्यानुसार खुलासे घेण्याचे काम सुरू होते.
एकूणच या सगळ्या प्रकरणावरून महिला पोलीस शिपायाने काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या तर केली नसावी? असा संशयदेखील व्यक्त केला जात आहे.

Web Title: Suspected death of female employee at Adgaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.