कवडासर खून प्रकरणी संशयित अटकेत
By admin | Published: June 15, 2015 11:20 PM2015-06-15T23:20:33+5:302015-06-15T23:25:04+5:30
कवडासर खून प्रकरणी संशयित अटकेत
दिंडोरी : कवडासर येथील सरपंच सरु बाई जयराम गवळी व त्यांचे पती जयराम ठमा गवळी यांच्या हत्त्येप्रकरणी एका संशयित आरोपीस दिंडोरी पोलिसांनी अटक केली असून, आपल्या घरी का आला या संशयावरून वृद्धाचा खून केल्याचा प्रकार प्राथमिक तपासात पुढे आला आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कवडासर येथील सरपंच सरूबाई जयराम गवळी व त्यांचे पती जयराम ठमा गवळी यांच्या हत्त्येप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरत तपास करत रात्री उशिरा या हत्त्याकांड प्रकरणी गावातीलच किसन नामदेव गवळी (३२) यास ताब्यात घेतले असता गुन्ह्याची उकल झाली आहे. मयत जयराम गवळी हे परिसरात भगत म्हणून परिचित होते. त्यांचे संशयित आरोपी किसन यास त्याचे घरी येणे-जाणे पसंत नव्हते. तो त्याच्यावर संशय घेत होता. शनिवारी रात्री किसन हा शेतात पाखरे मारून घरी आला असता त्याला जयराम गवळी तेथे उभा आढळल्याने त्याला राग अनावर झाला व त्याने जयराम यास धमकावले. यानंतर जयराम याने तेथून पळ काढला; मात्र किसन याने त्यास नाल्याजवळ गाठत त्याचेवर कोयत्याने वार करत दगडाने ठेचून मारले. यानंतर त्याने घरात झोपलेल्या असलेल्या सरपंच सरूबाई गवळी यांचेवरही कोयत्याने हल्ला करत ठार मारले. दिंडोरी पोलिसांनी किसन यास अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर गणकवार हवालदार बोरसे करत आहे.(वार्ताहर)