नाशकात आढळला झिका संशयित रुग्ण; आरोग्य विभाग सतर्क
By Suyog.joshi | Published: November 30, 2023 10:32 AM2023-11-30T10:32:45+5:302023-11-30T10:33:04+5:30
महापालिकेला मार्गदर्शक तत्वे जारी केली असून आरोग्य विभागाला सज्जता ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सुयोग जोशी
नाशिक : राज्यात इचलकरंजीमध्ये दोन तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये झिकाचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला असून नाशिकमध्येही पहिला झिका संशयित रुग्ण आढळला आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून सध्या हा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
दरम्यान चीन येथे नुमोनियाचा वाढलेला उद्रेक पाहता केंद्र शासनाने याबाबत महापालिकेला मार्गदर्शक तत्वे जारी केली असून आरोग्य विभागाला सज्जता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे कोरोना संसर्गाची सुरुवात चीनमध्ये झाली होती. आता तेथे न्युमोनियाचा उद्रेक झाला आहे. हा संसर्ग भारतातही पसरण्याची भीती असल्याने केंद्राने सर्व महापालिकेतील आरोग्य विभागाना या संकटाबाबत उपाययोजना सज्जता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात प्रामुख्याने औषधसाठा, खाटा, आॅक्सिजन पुरवठा आदींवर भर देण्यात आला आहे. तसेच रुग्णालयांमध्ये मास्क, डाॅक्टरांनी पीपीई किटचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत.
शहरात एक झिका संशयित रुग्ण सापडला असून त्यावर खासगी उपचार सुरु आहेत.तसेच न्युमोनियाच्या वाढता उद्रेक पाहता केंद्राने सावधनता बाळगण्याचे आदेश देत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
- डाॅ.तानाजी चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा