प्रसादविक्रेता खून प्रकरणातील संशयितांना अटक
By Admin | Published: February 12, 2017 12:49 AM2017-02-12T00:49:30+5:302017-02-12T00:49:42+5:30
प्रसादविक्रेता खून प्रकरणातील संशयितांना अटक
नाशिक : रामकुंडावरील प्रसादविक्रेता मंगेश पाटील (४२, गल्ली नंबर २, मायको दवाखान्याच्या पाठीमागे, दिंडोरीरोड) याच्या खुनातील संशयित विकी कीर्ती ठाकूर (२२, रा. पेठरोड) व पवन भगतराम खत्री (२३, रा. शनिचौक, पंचवटी) या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़ सुरगाण्याजवळ घाटात ३ डिसेंबर २०१६ रोजी मंगेश पाटील याचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने सुरगाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे़
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयित गुन्हेगारांची शोध मोहीम सुरू आहे़ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या पथकाने संशयित ठाकूर व खत्री यांना ताब्यात घेतले़ या दोघांचीही सखोल चौकशी केली असता त्यांनी २ डिसेंबर २०१६ रोजी मंगेश याला सुरगाणा येथे नेऊन बेदम मारहाण करून खून केल्याची कबुली दिली़ तसेच या खुनात जयेश हिरामण दिवे, राहुल वसंत नंदन, धिरज लालवाणी (सर्व रा. पंचवटी) यांचाही सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले़ या संशयितांच्या शोध मोहिमेत शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव, शिपाई योगेश सानप, परमेश्वर दराडे, बाळू नांद्रे, पोलीस नाईक साबळे आदिंचा सहभाग होता़ (प्रतिनिधी)