चोर पोलिसाच्या पाठशिवणीत पोलिस वाहनाच्या धडकेने संशयितांचा मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2023 05:02 PM2023-07-03T17:02:29+5:302023-07-03T17:04:33+5:30

किशोर सूर्यवंशी मार्गावरील मध्यरात्रीची घटना

Suspects killed by a police vehicle in the back seam of a thief police? | चोर पोलिसाच्या पाठशिवणीत पोलिस वाहनाच्या धडकेने संशयितांचा मृत्यू?

चोर पोलिसाच्या पाठशिवणीत पोलिस वाहनाच्या धडकेने संशयितांचा मृत्यू?

googlenewsNext

संदीप झिरवाळ

नाशिक: म्हसरूळ परिसरात पहाटेच्या सुमाराला एटीएम मशिन फोडून चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांचा पाठलाग करतांना पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ रंगला खरा मात्र या घटनेत एक संशयित थेट म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाच्या पोलिस वाहनाला धडकल्याने ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.3) मध्य रात्रीच्या सुमाराला किशोर सूर्यवंशी मार्गावर घडल्याचे वृत्त आहे.

पोलिस वाहनाने धडक दिल्याने ठार झालेला संशयित हा 30 ते 35 वयोगटातील असून तो उत्तरप्रदेश किंवा बिहार राज्यातील गुन्हेगार असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला मात्र या घटनेतील मयताची ओळख पटली नाही. याबाबत समजलेली माहिती अशी सोमवारी (दि.3) मध्यरात्रीच्या सुमाराला म्हसरूळ परिसरात तीन ते चार संशयितांनी एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने संशयितांनी आपला मोर्चा किशोर सूर्यवंशी मार्गावर असलेल्या एका बँकेच्या एटीएमकडे वळविला. संशयित एटीएम फोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, सीआर मोबाईल व गुन्हा शोध पथकाचे पोलिस कर्मचारी किशोर सूर्यवंशी मार्गाच्या दिशेने पोलिस सायरन वाजवत रवाना झाले.

किशोर सूर्यवंशी मार्गावर एटीएम फोडण्याचा तयारीत असलेल्या संशयितांना पोलिस वाहनाच्या सायरनचा आवाज आल्याने संशयितांनी त्या ठिकाणाहून अंधाराच्या दिशेने पळ काढला तर एक संशयित रस्त्याच्या डाव्या बाजूला पळत असतांना थेट गुन्हा शोध पथकाच्या पोलिस वाहनाला धडकला त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला म्हसरूळ पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. सदर अपघाताची घटना घडल्यानंतर पोलिस जखमी संशयिताला रुग्णालयात नेण्याची धावपळ करत असतांना त्याचे इतर साथीदार मात्र पसार झाले.

रात्र गस्तीवर असलेल्या गुन्हा शोध पथकाच्या पोलिस वाहनाने धडक दिल्याने ठार झालेला संशयित गुन्हेगार असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला असून मयताच्या बोटांचे ठसे देखिल घेतले आहे. एटीएम मशिन फोडण्याच्या इरादाने आलेल्या संशयितांचा पोलिस वाहनाने धडक दिल्याने अपघातात मृत्यू झाल्याचे सुतोवाच पोलिसांनी केले असले तरी नेमका संशयित घाबरून पोलिस वाहनाच्या खाली आला की? पोलिस वाहनाने त्याला पाठलाग करतांना उडविले? याचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून त्यानुसार फरार झालेल्या संशयितांचा व ते कोणते वाहन घेऊन आले होते का? याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या अपघाताबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Suspects killed by a police vehicle in the back seam of a thief police?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.