फुलेनगरला गोळीबार करणाऱ्या संशयितांची धिंड; दहशत मोडून काढत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 04:14 PM2023-03-22T16:14:42+5:302023-03-22T16:15:54+5:30
फुलेनगर परिसरात राहणारे संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, जय खरात व संदीप अहिरे आदी चौघांनी पूर्ववैमनस्यातून प्रेम दयानंद महाले याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
- संदीप झीरवाळ
पंचवटी : पेठरोड फुलेनगर येथील मुंजाबाबा चौकात दहा दिवसांपूर्वी शनिवारी (दि. ११) हातात धारदार कोयते नाचवून दहशत पसरवून युवकावर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत माजविणाऱ्या संशयितांबाबत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी तसेच त्यांच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे यावे, यासाठी मंगळवारी (दि. २१) सायंकाळी पोलिसांनी संशयितांची परिसरातून धिंड काढली.
फुलेनगर परिसरात राहणारे संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, जय खरात व संदीप अहिरे आदी चौघांनी पूर्ववैमनस्यातून प्रेम दयानंद महाले याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी महाले हा जीव वाचवून पळाला असताना संशयितांनी गोळीबार केला होता. त्यातील एक गोळी महाले याची आई उषा यांना चाटून गेली, तर दुसरी गोळी पाळीव श्वान टॉमीच्या पायाला लागल्याने महाले याची आई व पाळीव श्वान जखमी झाले. या घटनेनंतर संशयित फरार झाले होते. मात्र, गोळीबाराची घटना परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोधपथकाने जय खरात, संदीप अहिरे, विकी वाघ या तिघांना ग्रामीण भागातून सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त केला असून, संशयितांची फुलेनगर परिसरात दहशत असल्याने त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी व संशयितांविरूद्ध आणखी कोणाच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे यावे, यासाठी मंगळवारी (दि. २१) तिघांची परिसरातून धिंड काढण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयितांची असलेली दहशत कमी व्हावी, यासाठी सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, रणजित नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांनी संशयित आरोपी खरे, वाघ व अहिरे आदींची फुलेनगर मुंजाबाबा चौक परिसरातून धिंड काढत संशयितांकडून सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास आहे, याबाबत माहिती जमा केली.