निलंबित कर्मचारी तहसीलदाराकडून परस्पर कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:29 AM2018-09-27T01:29:08+5:302018-09-27T01:29:26+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखांत घोळ घातल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी निलंबित केलेल्या लिपिकास त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदाराने गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविल्यामुळे निलंबित कर्मचाºयाला परस्पर कामावर घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखांत घोळ घातल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी निलंबित केलेल्या लिपिकास त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदाराने गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविल्यामुळे निलंबित कर्मचाºयाला परस्पर कामावर घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तहसीलदाराने काढलेल्या आदेशाला जिल्हा प्रशासनानेही मूक संमती दर्शविल्याची बाब गंभीर मानली जात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात येऊनही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात तारखांचा घोळ घातल्याचा ठपका ठेवून २२ जून रोजी जिल्हाधिकाºयांनी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार कनोजे व लिपिक देशमुख यांना निलंबित केले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली होती. निलंबन काळात कनोजे व देशमुख या दोघांचेही मुख्यालय बदलण्यात आले असून, त्यांनी या काळात नुसती मुख्यालयी हजेरी लावणे क्रमप्राप्त असले तरी, मिळालेल्या माहितीनुसार निलंबित दोघांनाही त्र्यंबकेश्वरचा ‘मोह’ सुटलेला नाही. कनोजे यांच्या वरच्यावर त्र्यंबकेश्वरला घिरट्या चालू असतात तर देशमुख यांच्याकडून त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाचे काम अजूनही करून घेतले जात असल्याचे सर्रारसपणे नजरेस पडते. मुळात निलंबित कर्मचाºयाला त्याच्या निलंबनाच्या काळात शासकीय कामकाज सोपविता येत नाही, तसेच ज्या कार्यालयाने निलंबित केले तेथे हजर राहू दिले जात नाही अशी तरतूद आहे. त्यांना ज्या कारणासाठी निलंबित केले त्याची चौकशी पूर्ण होऊन समितीमार्फतच निलंबन मागे घेतले जाते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी कनोजे, देशमुख या दोघांचे निलंबन करण्यात येऊन ते अद्यापही कायम असताना नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांनी निलंबित कर्मचारी देशमुख यांच्यावर त्र्यंबकेश्वरची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची लेखी जबाबदारी सोपविली. या लेखी आदेशात सोपविलेली जबाबदारी बजावण्यास दिरंगाई केल्यास कारवाई करण्याची तंबीही देशमुख यांना दिली.
त्र्यंबकेश्वर तहसीलदारांनी आदेश दिल्यामुळे देशमुख यांनी कर्तव्य पार पाडले असले तरी, अशा प्रकारे आपल्या अधिकारात निलंबित कर्मचाºयाला कायदा व सुव्यस्थेसारखी महत्त्वाची जबाबदारी सोपविता येते काय? असा प्रश्न आता महसूल वर्तुळात विचारला जात आहे. विशेष म्हणजे तहसीलदारांनी बजावलेल्या आदेशाची प्रत थेट जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आल्यामुळे निलंबित कर्मचाºयाला कामावर घेण्याच्या या प्रकारास जिल्हा प्रशासनाचीही मूक संमती असल्याचे मानले जात असल्याने नजीकच्या काळात अन्य निलंबित कर्मचाºयांनाही याचा लाभ होण्याची शक्यता आहे.