‘आरटीओ’ एजंट मनाईला स्थगिती
By Admin | Published: January 30, 2015 12:45 AM2015-01-30T00:45:57+5:302015-01-30T00:46:07+5:30
‘आरटीओ’ एजंट मनाईला स्थगिती
नाशिक : प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना पाठविलेल्या पत्रानुसार आरटीओ कार्यालयात एजंट, तसेच अनधिकृत व्यक्तींना येण्यास बंदी घालण्यात आली आहे़ याविरोधात नागपूर येथील नाशिक मोटर ओनर्स रिप्रेझेंटेटिव्ह युनियन, तसेच वाहन मालक संघटनेने बुधवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होऊन आयुक्तांच्या पत्राला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे़.
परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात आरटीओ एजंटला बंदी घालण्यात यावी, असे परिपत्रक राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना पाठविले आहे.या पत्राची अंमलबजावणीसाठी १७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती़ त्यानुसार राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील एजंटांनी आयुक्तांनी पाठविलेले पत्र वा आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते़ नाशिकचे प्रतिनिधी तेजिंदरसिंग मनमोहनसिंग बिंद्रा यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ होती, तर नागपूर येथील मोटर ओनर्स रिप्रेझेंटेटिव्ह युनियन, तसेच वाहन मालक संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती़ यामध्ये म्हटले होते की, वाहन मालकांना प्रत्येक कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणे वेळेअभावी परवडणारे नाही़ यामुळे आमच्या वतीने एजंटांची नेमणूक केली असता त्यांना काम करू देण्यात हरकत नसावी़ या याचिकेवर आज सुनावणी होऊन न्यायालयाने आयुक्तांच्या पत्रकास स्थगिती दिली़ यामुळे मोटर ओनर्स रिप्रेझेंटेटिव्ह युनियन, वाहन मालक संघटनेचे प्रतिनिधी व एजंटांमध्येही आनंदाचे वातावरण असल्याचे बिंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे़