मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सस्पेन्स, पण बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा
By संदीप भालेराव | Published: May 24, 2023 06:32 PM2023-05-24T18:32:36+5:302023-05-24T18:33:52+5:30
मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी हेाणार याबाबत अद्यापही सस्पेन्स आहे.
नाशिक: राज्यातील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार याबाबत सत्ताधाऱ्यांकडून अनेक तारखांची शक्यता सांगितली जात आहे. तर काहींनी आपणास हमखास मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे जाहीरही करून टाकले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी हेाणार याबाबत अद्यापही सस्पेन्स असतांना आमदार बच्चू कडू यांना मात्र दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष म्हणून मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
दिव्यांगांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे आणि त्यांच्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन उभारणाऱ्या बच्च कडू यांनी नेहमीच दिव्यांगांचे प्रश्न मांडले. दिव्यांगांच्या सन्मानासाठी आणि अधिकारासाठी त्यांचा स्वतंत्र विभाग असावा अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी होती. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयात स्थापन करण्यात आला. त्यामुळे या विभागाचे प्रमुख म्हणून कडू यांनाच मंत्रिपद मिळू शकते अशी चर्चा होती.
परंतु राज्यातील अस्थिर वातावारणामुळे कोणत्याच मंत्रीपदाबाबत निर्णय होत नव्हता. परंतु आता न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्तारची चर्चा पुन्हा जोर धरू लागली असून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यावर खल सुरू झालेला आहे. मात्र आमदार बच्चू कडू यांच्या नावाचे थेट परिपत्रकच काढण्यात येऊन त्यांना दिव्यांग कल्याण विभागाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
दिव्यांगासाठी राज्यात ६ जून पासून विशेष मोहिम राबविली जाणार आहे. दिव्यांगांना त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगबांधवांची शासकीय कामे होणार आहे. यासाठीसी एक समिती देखील स्थापन करण्यात आली असून कडू यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना यासाठी मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. मंत्र्यांना असलेले सर्व अधिकारी बच्चू कडू यांना असणार आहे.