ग्रामसेवक शरद उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 03:51 PM2021-01-22T15:51:51+5:302021-01-22T15:52:47+5:30
नांदगाव : तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील ग्रामसेवक शरद उबाळे यांच्यावर अपहार व कामातील दिरंगाईबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली.
लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीच्या झालेल्या कथित रोजगार हमी योजनेच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी यासाठी लक्ष्मीनगर ग्रामस्थांनी सत्याग्रह आंदोलन नांदगाव पंचायत समिती समोर केले. सायंकाळी गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे पुढील चौकशीसाठी पत्र दिले व आंदोलनकर्त्यांना दहा दिवसांच्या मुदतीत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
लक्ष्मीनगरचे बाबासाहेब घाडगे, दिगंबर सोनवणे, रोहीदास उगले, भाऊसाहेब उगले, रघुनाथ ऊगले, गंगाधर ऊगले आदी ग्रामस्थांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शरद उबाळे यांनी चौदाव्या वित्त आयोगाचे दप्तर अपुर्ण व त्यामध्ये ४,२०,३८५ रुपयांचा अपहार, वित्त आयोगातून स्वतःच्या नावाने चेक काढणे, ग्रामनिधी कॅशबुक अपूर्ण, मासिक सभेचे प्रोसेडिंग बुक अपूर्ण तसेच कामातला हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी उबाळे यांना निलंबित केले. अनेक महिन्योत लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली नसल्याने गावाचा विकास थांबला आहे, अशी तक्रार आंदोलकांनी केली आहे.