त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मुलाखतींना स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:23 AM2018-06-19T01:23:14+5:302018-06-19T01:23:14+5:30
: येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विश्वस्तपदासाठी होणाऱ्या मुलाखती आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विश्वस्तपदासाठी होणाऱ्या मुलाखती आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत. येत्या २६ जून रोजी स्थगित झालेल्या मुलाखती घेण्यात येणार आहे. याबाबत तातडीचे पत्र विभागीय धर्मादाय आयुक्त प्र. भी. घुगे यांनी ११३ अर्जदारांना पाठवले आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदाची मुदत संपल्याने नवीन विश्वस्त नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण नऊ विश्वस्तांपैकी पाच विश्वस्त पदसिद्ध आहेत. उर्वरित चार जागांसाठी ११३ अर्ज दाखल झाले आहेत. देवस्थान विश्वतांमध्ये नऊऐवजी १३ विश्वस्त असावेत, त्यात ५० टक्के महिलांना आरक्षण असावे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीशांऐवजी जिल्हाधिकारी असावेत आदी मुद्दे ललिता शिंदे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत मांडले आहेत. मांडलेले चार मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले असून, विश्वस्तपदाच्या मुलाखतींना स्थगिती दिली आहे. न्यायालय पुढे काय निर्णय घेते याकडे संपूर्ण त्र्यंबकेश्वरवासीयांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात न्यायालयाने महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त मुंबई, जिल्हाधिकारी नाशिक व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांना नोटिसा पाठविल्या आहेत.