मनसेच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:19 AM2019-11-19T01:19:09+5:302019-11-19T01:20:49+5:30

महापौरपदासाठी विरोधकांनी महाशिव आघाडीची तयारी केली असली तरी त्याला अद्याप मूर्तस्वरूप मिळालेले नाही. त्यातच मनसेने अद्याप शिवसेना की भाजप यांना पाठिंबा दिलेला नसून वेट अ‍ॅँड वॉच असे करीत बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करायचे ठरवले आहे.

 Suspension of MNS role | मनसेच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम

मनसेच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम

Next

नाशिक : महापौरपदासाठी विरोधकांनी महाशिव आघाडीची तयारी केली असली तरी त्याला अद्याप मूर्तस्वरूप मिळालेले नाही. त्यातच मनसेने अद्याप शिवसेना की भाजप यांना पाठिंबा दिलेला नसून वेट अ‍ॅँड वॉच असे करीत बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करायचे ठरवले आहे. त्यामुळे नाशिकवर विशेष लक्ष देणारे राज ठाकरे महाशिव आघाडीत सहभागी होऊन सेनेला पाठिंबा देतात की तटस्थ राहून अप्रत्यक्ष भाजपला साथ देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
भाजपचे बहुमत असले तरी या पक्षाला संभाव्य फाटाफुटीच्या चिंतेने ग्रासले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पथ्यावर हीच बाब पडली असून, त्यांनी सर्वच विरोधी पक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव सुरू केली आहे. या विरोधी पक्षांमध्येच महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचीदेखील भूमिका महत्त्वाची आहे. या पक्षाचे एकूण सहा नगरसेवक असून, स्थायी समितीत सत्तेत स्थान मिळावे यासाठी अपक्ष मुशीर सय्यद यांना मनसेने सामावून घेतल्याने एकूण सहा जणांचा गट आहे. मनसे या निवडणुकीत कोणाला साथ देणार असा प्रश्न असला तरी पक्षाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्थानिक नगरसेवकात महाशिव आघाडीत स्थान देण्यावरून दुमत आहे. त्यामुळे रविवारी (दि. १७) राज ठाकरे यांच्याशी डॉ. प्रदीप पवार, अशोक मुर्तडक, अनंता सूर्यवंशी आणि सलीम शेख यांनी चर्चा केली. महापालिकेतील राजकीय स्थिती राज ठाकरे यांच्यासमोर स्पष्ट करण्यात आली असून, राज यांनी बुधवारी किंवा गुरुवारी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे महाआघाडीची जुळवाजुळव करण्यात अडचण झाली आहे. मनसेचे पाच नगरसेवक काय भूमिका घेतात यावर बराच निर्णय बदलू शकतो. त्यामुळे मनसे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
दोन्ही संभाव्य निर्णयाचे पक्षादेश तयार?
महापौरपदासाठी मनसेच्या वतीने दोन संभाव्य पक्षादेशदेखील तयार करून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाच्या सध्याच्या गटनेता नंदिनी बोडके या असल्या तरी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करताना सलीम शेख हे गटनेता आहेत. त्यामुळे त्यांच्याही सहीचे पक्षादेश तयार करून ठेवण्यात आले आहेत. आता केवळ राज यांनी आदेश देताच त्यावर सह्या करून ते नगरसेवकांना बजावण्यात येणार आहेत.
२०१२ मध्ये मनसेचे चाळीस नगरसेवक होते. त्यावेळी बहुमतासाठी भाजपने मनसेला पाठिंबा दिला होता. तर उत्तरार्धात कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने पाठिंबा दिला होता. परंतु सेनेने मात्र विरोधाची भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेत तर त्यापेक्षा वेगळे राजकारण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय निर्णय देतात याबाबत उत्सुकता आहे. विशेषत: राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम सत्ता मिळाली होती. त्यानंतर आतादेखील दोन वर्षांनी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असून, अशावेळी राज हे विचारपूर्वकच निर्णय घेतील, असे मनसेच्या वतीने सांगितले जात आहे.
महापालिकेतील स्थितीबाबत राज ठाकरे यांना अवगत करण्यात आल्यानंतर ते बुधवारी किंवा गुरुवारी निर्णय देणार आहे. त्यांचा निर्णय काहीही असला तरी तो महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा किंवा निर्णायक ठरू शकतो.
- सलीम शेख,
माजी गटनेता, मनसे

Web Title:  Suspension of MNS role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.