११ कोटींचा मोबदला देण्यास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:56 AM2019-06-26T00:56:48+5:302019-06-26T00:57:03+5:30
शिवाजीवाडी येथील गोठ्यांच्या आरक्षित भूखंडासाठी ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यावरून महापालिकेच्या महासभेत बराच गदारोळ झाला. यासंदर्भात नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिलेल्या आक्षेपांची छाननी करून मगच मोबदला अदा केला जाईल...
नाशिक : शिवाजीवाडी येथील गोठ्यांच्या आरक्षित भूखंडासाठी ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यावरून महापालिकेच्या महासभेत बराच गदारोळ झाला. यासंदर्भात नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिलेल्या आक्षेपांची छाननी करून मगच मोबदला अदा केला जाईल, असे आश्वासन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.२५) दिले. त्यानंतरच या वादग्रस्त विषयाला विराम मिळाला.
महापालिकेच्या वतीने शिवाजीवाडी येथे गोठ्यांसाठी आरक्षित जागा असून, पंधरा वर्षांपासून त्याचा मोबदला देण्याचा विषय प्रलंबित आहे. आता न्यायालयाच्या आदेशाने संबंधित जागा मालकाला ११ कोटी ४३ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव असला तरी त्यास भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आक्षेप घेतला होता. एकीकडे महापालिका शहरातील गोठ्यांना हद्दीबाहेर स्थलांतरित करीत असताना दुसरीकडे गोठ्यांसाठी भूसंपादन करण्याचे कारण काय असा आक्षेप त्यांनी घेतला होता. मंगळवारी (दि.२५) महासभेत हा विषय त्यांनी उपस्थित केला.
भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये दिले जात असल्याने नगरसेवक मुकेश शहाणे व योगेश शेवरे यांनी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी फ्लेक्स बॅनर घालून महासभेत उभे राहिले; त्यांनी शहरातील भूसंपादनासाठी न्यायालयाचा कोणताही सक्षम आदेश नसताना केवळ कोणावर तरी कृपादृष्टी करण्यासाठी ११ कोटी ४३ लाख रु पये देण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. नगरसेवक प्रशांत दिवे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गजानन शेलार यांच्यासह काही नगरसेवकांनी भूसंपादाच्या नावाखाली आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त करून कोट्यवधी रुपये देण्याचा प्रशासनाचा हा डाव आहे, तो कदापि सहन केला जाणार नाही, असे आरोप केले. अजय बोरस्ते, चंद्रकात खोडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.