गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:57 PM2018-11-01T23:57:06+5:302018-11-01T23:57:20+5:30
नाशिक : जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादाने गुरुवारी नाट्यमय वळण घेतले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या आदेशान्वये सकाळी गंगापूर, दारणा धरणातून पाणी सोडल्यानंतर ते नांदूरमधमेश्वरपर्यंत पोहचले असतानाच पाटबंधारे खात्याने गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती दिली. त्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गंगापूर धरणाचे तिन्ही दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. मात्र दारणा, पालखेडमधून पाणी सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे खात्याच्या या निर्णयामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असला तरी, सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे साडेआठ तासांत ८० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आले आहे.
नाशिक : जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादाने गुरुवारी नाट्यमय वळण घेतले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या आदेशान्वये सकाळी गंगापूर, दारणा धरणातून पाणी सोडल्यानंतर ते नांदूरमधमेश्वरपर्यंत पोहचले असतानाच पाटबंधारे खात्याने गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती दिली. त्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गंगापूर धरणाचे तिन्ही दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. मात्र दारणा, पालखेडमधून पाणी सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे खात्याच्या या निर्णयामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असला तरी, सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे साडेआठ तासांत ८० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आले आहे. नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून लढाई सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत दाखविलेल्या तत्परतेबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात असून, गंगापूरमधून नांदूरमधमेश्वर धरणात पोहोचलेल्या ८० दशलक्ष घनफूट पाण्याला जबाबदार कोण? असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे. एकूणच जिल्ह्यातील धरणांचे पाणी राजकीय व शासकीय पातळीवर चांगलेच गाजले आहे.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात फक्त ३५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याकारणाने समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने २३ आॅक्टोबर रोजी दिल्यानंतर या संदर्भातील राजकीय व शासकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. पाटबंधारे महामंडळाच्या दबावामुळे जिल्हा प्रशासनाने २९ आॅक्टोबर रोजी पाणी सोडण्यासाठी संपूर्ण तयारी केली असता, सर्वोच्च न्यायालयात विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने केलेल्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने ३१ आॅक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास स्थगिती दिली होती. त्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्याला तात्पुरता दिलासा मिळाला. परंतु तो अल्प ठरला. बुधवारी न्यायालयाने विखे पाटील साखर कारखान्याची याचिका फेटाळून लावल्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे पाटबंधारे महामंडळाने जाहीर केले व ठरल्यानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले.
नांदूरमधमेश्वरमध्ये पाणी अडविले
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणांतून गुरुवारी सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. गंगापूर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात येऊन साधारणत: दिवसभर ३५२४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर दारणामधून प्रारंभी ७२७३, ९८८४ व १११५८ क्यूसेक वेगाने दिवसभर पाणी सोडण्यात आले. सायंकाळपर्यंत सदरचे पाणी नांदूरमधमेश्वर धरणापर्यंत पोहोचले. सध्या नांदूरमधमेश्वर धरणात पाणीच नसल्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून ठेवण्यात आले असून, पाण्याची वहन गळती रोखण्यासाठी धरणात पुरेसे पाणी साठल्यास शुक्रवारी दुपारनंतर धरणाचे दरवाजे उघडून पाणी जायकवाडीपर्यंत झेपावणार आहे.
दारणातून विसर्ग सुरूच
दरम्यान, जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती दिली असली तरी, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीतील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून सुमारे ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड धरण समूहातून २.६४ टीएमसी पाणी सोडण्यात येणार व उर्वरित पाणी नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून सोडण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी दारणा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी दारणा धरणात भावली व भाम या दोन धरणांमधून पाणी सोडून साठा करण्यात आला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती असली तरी, दारणा धरणाचे पाणी मात्र जायकवाडीसाठी द्यावेच लागणार आहे. आगामी तीन दिवस धरणातून पाणी सोडले जाणार आहे. गंगापूरऐवजी मुकणेचा पर्याय
गंगापूर धरणातून सकाळी पाणी सोडल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या. आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूरमधून जायकवाडीस पाणी सोडण्यास विरोध केला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्टÑ जलसंपत्ती प्राधिकरणाच्या अध्यक्षांना पत्र देऊन नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व गंगापूर धरणाच्या पाण्यावर असलेले आरक्षण पाहता गंगापूर धरणातून पाणी सोडू नये त्याऐवजी मुकणे धरणातून पाणी सोडावे, अशी भूमिका घेतली होती. या संदर्भात पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही त्यांनी भेट घेतली होती. अखेर रोखले पाणीसायंकाळी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास रोखण्याचे तोेंडी आदेश देण्यात आल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. दिवसभरातून गंगापूर धरणातून ८० दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, जिल्हाधिकाºयांनी केलेल्या नियोजनानुसार गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार होते.