राज्यात शाळा नोंदणी लांबल्याने प्रवेशप्रक्रियेविषयी साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:45 AM2019-03-05T01:45:05+5:302019-03-05T01:45:34+5:30
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर यावर्षी तब्बल दोन महिन्यांच्या विलंबानंतर सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे.
नाशिक : आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर यावर्षी तब्बल दोन महिन्यांच्या विलंबानंतर सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे. यापूर्वी डिसेंबर अखेरपासून सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला यावर्षी २५ फेब्रुवारीचा मुहूर्त लाभला होता. परंतु, शिक्षण विभागाची प्रवेशप्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली नसल्याने ही प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली असून, ही प्रक्रिया ५ मार्चला सुरू होणार असल्याची सूचना संकेतस्थळावर झळकत आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळा नोंदणीची प्रक्रिया अजूनही प्रलंबित असल्याने आरटीई प्रवेशप्रक्रिया सुधारित वेळापत्रक ानुसार सुरू होणार का? याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रिया अंतर्गत शाळांना नोंदणी व पडताळणीसाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ४५७ शाळांची नोंदणी व पडताळणी पूर्ण झाली आहे. यात १२१ पूर्वप्राथमिक व ५ हजार ६४३ प्राथमिक (पहिली)च्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध असणार आहे. अशा एकूण ५ हजार ७६४ जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.
संकेतस्थळावर जुनीच माहिती
शिक्षण विभागाने आरटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार मंगळवारी (दि.५) आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत संकेतस्थळावर नवीन शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत प्रवेशप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या शाळांची कोणतीही माहिती अपलोड करण्यात आलेली नव्हती. संकेतस्थळावर मागील वर्षाचीच माहिती असल्याने संबंधित शाळांची नोंदणी व पडताळणी पूर्ण झाली की नाही याविषयी पालकांमध्ये साशंकता निर्माण झाली होती.