नाशिकमध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचा संशय; टँकरांची तपासणी होणार
By Sandeep.bhalerao | Published: September 8, 2023 01:56 PM2023-09-08T13:56:30+5:302023-09-08T13:56:42+5:30
सिन्नरमध्ये दूध भेसळ लक्षात आली असली तरी जिल्ह्यात अनेक भागांत अशाप्रकारची भेसळ होत असल्याचा संशय आहे.
नाशिक: शहर, जिल्ह्यात वितरित होणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचा संशय असल्याने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. विशेषता: गुजरात राज्यातून येणारा मावा आणि खवा यांची तपासणी केली जाणार असून अचानक धाडी टाकण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यात येणाऱ्या दुधाच्या टँकर्सची देखील तपासणी केली जाणार असून भेसळयुक्त दूध आढळल्यास ते नष्ट केले जाणार आहे. जिल्हा प्रशासन याबाबत सतर्क झाले असून त्यांनी टेस्टींग व्हॅन देखील सज्ज केली आहे.
जिल्ह्यातील दूध विक्रेत्यांनी उच्च गुण प्रतीचे, भेसळविरहीत दूध व दुग्धजन्य पदार्थांचीच विक्री करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पारधे यांनी केले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल टेस्टिंग व्हॅनच्या माध्यमातून तपासणी करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. गुजरात राज्यातून येणारा खवा, मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पारधे यांनी कळविले.
सिन्नरमध्ये दूध भेसळ लक्षात आली असली तरी जिल्ह्यात अनेक भागांत अशाप्रकारची भेसळ होत असल्याचा संशय आहे. मात्र, पुरेशी यंत्रणा नसल्याने दूध भेसळीची तपासणी वेळोवेळी होत नाही. आता एक प्रकार समोर आल्याने जिल्हा प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारला आहे. पथकांमार्फत तपासणी करण्यात आलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ कमी गुणप्रतीचे, भेसळयुक्त व मुदतपूर्व दिनांक नमूद नसल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापनेवर जिल्हास्तरीय समितीमार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येणा आहे.