शिरसाटे, मोडाळे गावात रेशनधान्य घोटाळ्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:22+5:302021-09-07T04:19:22+5:30
नाशिक: इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे व मोडाळे गावातील रेशन कार्डधारकांना नियमित आणि अन्नसुरक्षा योजनेतील पुरेसे धान्य दिलेच जात नसल्याचीे गंभीर ...
नाशिक: इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे व मोडाळे गावातील रेशन कार्डधारकांना नियमित आणि अन्नसुरक्षा योजनेतील पुरेसे धान्य दिलेच जात नसल्याचीे गंभीर बाब रेशन कार्ड नंबरवरून उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारकर्त्याने गावातील कार्डधारकांना आपल्या नावावर दिले गेलेले धान्य आणि प्रत्यक्ष मिळालेले धान्य याची प्रिंट आउटच दिल्याने गावकऱ्यांच्या लक्षात सदर प्रकार आला. या प्रकरणी ग्रामस्थांनी इगतपुरी तहसीलदारांकडे तक्रार केली असून, आता पुरवठा विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
रेशनवरील धान्य वाटप करताना होणार गैरप्रकार टाळण्यासाठी चार वर्षांपूर्वी बायोमेट्रिक पद्धत अंमलात आणली गेली. कार्डधारकांनी थम दिल्यानंतर त्याच्या नावाचे धान्य वाटप केले जाते, परंतु प्रत्यक्षात किती धान्य मिळते, म्हणजेच पॉझ मशीनवर किती धान्याची नोंद केली गेली, याबाबत कार्डधारकाला अंधारात ठेवले जात असल्याने धान्य वितरणात गैरप्रकार होत असल्याचा संशय बळावला आहे. याबाबत तक्रारदार दिनकर बोडके यांनी रेशन कार्ड क्रमांकावरून याबाबतची माहिती ऑनलाइन मिळविली असता, कुटुंब सदस्य संख्येनुसार मिळणारे धान्य निम्मेच दिले गेल्याची बाब निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे.
या घटनेनंतर त्यांनी गावातील अनेकांच्या रेशन कार्ड क्रमांकावरून याबाबतची माहिती मिळविली असता, अनेकांना कमी प्रमाणात धान्य दिले गेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी या प्रकरणी इगतपुरी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करून, संबंधित रेशन दुकानदारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रेशन कार्डधारकांना अंधारात ठेवून त्यांना धान्याचा मोठा अपहार झाला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दुकाने बंद ठेऊन धान्य वाटपाची संधी कशी कमी होईल, या उद्देशानेच दुकाने जाणीवपूर्वक बंद ठेऊन कार्डधारकांना विनाकारण चकरा मारण्यास भाग पाडले जाते. आता मिळेल ते धान्य पदरात पाडून घेत, कार्डधारकाही कोणतीही शहानिशा न करता धान्य घेऊन निमूटपणे निघून जातात. याचा रेशन दुकानदार गैरफायदा घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
--इन्फो--
अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त धान्य दुकानांची वेळ ही आठवड्याची सुट्टी सोडून सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास अशी ठेवण्यात आलेली आहे, परंतु शिरसाटे व मोडाळे गावातील रेशन दुकानेही महिन्यातून केवळ एक-दोन दिवसच उघडली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
--कोट--
रेशन कार्ड क्रमांकानुसार माहिती मिळविली असता, आपणाला मिळणाऱ्या धान्यापैकी केवळ निम्मेच धान्य दिले गेल्याची बाब समोर आली आहे. दुकानदारांकडून कार्डधारकांना मिळणाऱ्या धान्याची पावतीच दिली जात नसल्याने, अनेकांना आपले मंजूर धान्य किती, याची अधिकृत माहिती मिळत नाही. ग्राहकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
- दिनकर बोडके, मेाडाळे, तक्रारकर्ते.