गणवेश खरेदीचा संशयकल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:00 AM2018-08-04T01:00:21+5:302018-08-04T01:01:21+5:30
नाशिक : महापालिकेच्या ९२ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचे सर्वाधिकार शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले असताना त्यांच्यावर दबाव आणून गेल्यावर्षीचेच गणवेश विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचे दोनशे रुपयांचे गणवेश आता तीनशे रुपयांना खरेदी करून संबंधित आपले उखळ पांढरे करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
नाशिक : महापालिकेच्या ९२ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचे सर्वाधिकार शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले असताना त्यांच्यावर दबाव आणून गेल्यावर्षीचेच गणवेश विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचे दोनशे रुपयांचे गणवेश आता तीनशे रुपयांना खरेदी करून संबंधित आपले उखळ पांढरे करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. या दबावतंत्रामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आत गणवेश मिळणार किंवा नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत मुलांना गणवेशासाठी व्यक्तिगत खात्यांवर पैसे देण्यात आले होते; मात्र त्यावेळी मुलांना प्रती गणवेश दोनशे रुपये खात्यात देऊनही पालकांनी गणवेश घेतले नाही किंवा निधीचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना गणवेशासाठी थेट रक्कम न देता शाळांकडे ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
‘लोकमत’ने या दबाव तंत्रासंदर्भात वृत्त दिल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाकवी कालिदास कलामंदिरात प्रत्येक शालेय समितीला गणवेश खरेदीचे स्वातंत्र्य असून, सर्वांना ब्राइट गणवेश देण्याची सूचना केली आहे; मात्र असे असताना पुन्हा अनेक शाळांवर जुनेच गणवेश घेण्याची सक्ती केली जात असून, त्यामुळे अनेक शाळांचे मुख्याध्यापक संभ्रमात आहेत. तसेच बहुतांशी शाळांची गणवेश खरेदी रखडली आहे.शिक्षण मंडळात यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आाहेत. त्यामुळे विशिष्ट पुरवठादारांना गणवेश खरेदीचे काम मिळावे यासाठी हा आटापिटा सुरू असून, या स्पर्धेत मात्र मुले गणवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
जुनेच गणवेश नव्या दरात
महापालिकेच्या ९० शाळा असून, गेल्या वर्षी १२८ शाळा होत्या; मात्र जवळपास सर्वच शाळांमध्ये दोन तीनच व्यावसायिकांनी पुरवठा केला असून, त्यामुळे गणेवश खरेदीत बाह्य हस्तक्षेप होत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी जे गणवेश दोनशे रुपयांना होते तेच आता तीनशे रुपयांना गळी मारण्याचे प्रयत्न सुरू असून, त्या स्पर्धेमुळे मुख्याध्यापक गोंधळात पडले आहे.