नाशिकमधील आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 09:43 AM2019-01-22T09:43:31+5:302019-01-22T10:03:16+5:30
आडगाव शिवारातील स्मशानभूमीजवळ असलेल्या एका ओहळाजवळ मंगळवारी (22 जानेवारी) सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक - आडगाव शिवारातील स्मशानभूमीजवळ असलेल्या एका ओहळाजवळ मंगळवारी (22 जानेवारी) सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरातून जाणाऱ्या काही नागरिकांना मृतावस्थेत पडलेला बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या बिबट्याच्या अंगावरचे कातडे काढण्याचा प्रयत्न केला असून सदरचा बिबट्या हा कोणीतरी अन्य ठिकाणी मारून आडगाव शिवारात आणून टाकल्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला आहे. बिबट्याचा अपघात नसून घातपात करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. बिबट्याची माहिती समजताच काही वन्यजीव प्रेमी संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. मृतदेहावर कोठे ही जखम नसून केवळ पाठीवरून काही प्रमाणात कातडी गायब झाल्याचे दिसते. त्यामुळे अंधश्रद्धेपोटी बिबट्याचा बळी दिला असावा अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील कालवण तालुक्यात बिबट्याची कातडी विक्री करताना एकास वनविभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले होते. तर कातडी शाबूत असून वाहनांच्या धडकेत बिबट्या घसरला गेल्याने केवळ पाठीवरून केस निघाले आहे. किडनीच्या भागात जोरात आघात झाला असून अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बिबटया मृत्युमुखी पडल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. तरीदेखील संपूर्ण शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर अधिक स्पष्ट होईल.