मालेगावी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:25 AM2018-08-03T00:25:32+5:302018-08-03T00:26:27+5:30
मालेगाव : कॅम्पातील प्रसिद्ध डॉक्टर व रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे अध्यक्ष मनोज राजेंद्र भामरे (४०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मालेगाव : कॅम्पातील प्रसिद्ध डॉक्टर व रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे अध्यक्ष मनोज राजेंद्र भामरे (४०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
डॉ. मनोज भामरे मूळचे साक्री तालुक्यातील मालपूर येथील रहिवाशी होते. त्यांचा कॅम्पात शकुंतला भवन परिसरात आयुर्वेदिक दवाखाना आहे. डॉ. भामरे हे सोयगावच्या डी. के. पानस्टॉलजवळ तुळजाई कॉलनीत राहत होते. ते बुधवारी रात्री ९ वाजता मराठा दरबारमध्ये रोटरीच्या बैठकीसाठी गेले होते. त्यांना तेथे अस्वस्थ वाटू लागल्याने ते रात्री ११ वाजेच्या सुमारास औषधोपचारासाठी आपल्या दवाखान्यात गेले. तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षक भवारी यांनी सांगितले. दरम्यान मयत डॉक्टर भामरे यांच्या गळ्यात सोन्याची चैन व हातातील अंगठी घटनास्थळी मिळून आली.
डॉ. मनोज भामरे रात्री घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पहाटे चार वाजेपर्यंत त्यांची वाट बघितली. त्यानंतर त्यांचा शोध घेत दवाखान्यात आले असता दवाखान्याचा दरवाजा उघडा होता. आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत दिसून आले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान डॉ. भामरे यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक राजेंद्र भामरे यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. डॉ. भामरे यांच्या डोक्याला जखम झाली असून घटनास्थळी रक्त पडलेले होते. रोटरीचा कार्यक्रम झाल्यानंतर बैठक संपताच ते घरी येत. मात्र ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. डॉ. भामरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान या प्रकरणी कॅम्प पेलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहिते करीत आहेत.नातलगांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचा मृत्यू नैसर्गिकपणे झाल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितल्याचे पोलीस निरीक्षक भवारी यांनी सांगितले. मात्र कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.