संसरी दरोड्यातील संशयित ताब्यात तत्परता : अवघ्या चोवीस तासांत तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:41 AM2018-02-28T01:41:42+5:302018-02-28T01:41:42+5:30
देवळाली कॅम्प : फ्लॅटमध्ये दरोड्याचा प्रयत्न करून पती-पत्नीवर हल्ला करून पळून जाणाºया तिघा संशयितांच्या पोलिसांनी २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत.
देवळाली कॅम्प : संसरी येथील मोदकेश्वर सोसायटीत रविवारी मध्यरात्री गोकुळ गोडसे यांच्या फ्लॅटमध्ये दरोड्याचा प्रयत्न करून पती-पत्नीवर हल्ला करून पळून जाणाºया तिघा संशयितांच्या देवळाली कॅम्प पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत.
मोदकेश्वर सोसायटीत गोकुळ गोडसे यांच्या फ्लॅटमध्ये रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोन संशयित इसम दरोडा घालण्याच्या इराद्याने घुसले होते. यावेळी गोकुळ गोडसे हे मित्राचा हळदीचा कार्यक्रम आटोपून पुन्हा घरी आल्याने दोघा दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. यावेळी झालेल्या झटापटीत गोकुळ गोडसे यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले. तर गोकुळ यांची पत्नी दीपाली यांचा हात पिरगळून ढकलून दोघे दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, गुन्हे शाखा उपायुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली देवळालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, गुन्हे शाखा कर्मचारी सुनील जमधडे, संजय बोराडे, कृष्णा चव्हाण यांनी दरोडेखोरांची गोपनीय माहिती मिळवून अवघ्या २४ तासांत देवळा येथून संशयित दत्तू रामदास पवार (३५) रा.पिंपळनेर, साक्री; बापू ओंकार पवार (४५) रा. लोहणेर-देवळा व रमेश रामचंद्र शिंदे (६०) यांच्या मुसक्या आवळल्या. तिघा संशयितांना मंगळवारी नाशिकरोड न्यायालयामोर उभे केले असता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.