समर्थ तपस्थानाचा होणार कायापालट
By Admin | Published: February 19, 2017 11:50 PM2017-02-19T23:50:59+5:302017-02-19T23:51:17+5:30
पर्यटनस्थळाचा दर्जा : आगर टाकळी रामदास स्वामी मठाचा जीर्णोद्धार
मुकुंद बाविस्कर : नाशिक
रामाचा दास म्हणून आयुष्यभर बलोपासनेचे व्रत घेतलेल्या आणि त्यासाठी देशभरात ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारणारे समर्थ रामदास स्वामी यांची तपोभूमी असलेल्या आगर टाकळी तीर्थक्षेत्राचा आता कायापालट होणार असून, या परिसराला क दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळाल्याने या धार्मिक स्थळाकडे भाविकांसह पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.
ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या नाशिक परिसरातील अनेक तीर्थस्थानांपैकी एक असलेल्या आगर टाकळी येथे समर्थ रामदास स्वामी यांचे एक तप वास्तव्य होते. वयाच्या १२ व्या वर्षापासून २४ वर्षांपर्यंत अखंड व्यायाम, उपासना व अध्ययन या तिन्ही गोष्टींतून साधना करीत समर्थांना येथे ‘शेणाचा मारुती’ उभारण्याचे सांगण्यात येते. कालौघात हे स्थान काहीसे दुर्लक्षित झाले होते. दरम्यान, २0१२ पर्यंत न्यायालयीन प्रकरणामुळे या तीर्थक्षेत्राचा विकासही होऊ शकला नाही. परंतु त्यानंतर गेल्या ५ वर्षांपासून श्री मारुती देवस्थान आाणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ, आगर टाकळी संस्थानच्या वतीने शासनाकडे पाठपुरवा करून विकासकामांसाठी विधीची मागणी करण्यात आली, अशी माहिती संस्थानचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर यांनी दिली. शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आगर टाकळीला वर्षारंभी म्हणजे दीड महिन्यापूर्वीच क दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे. तसेच देवस्थान परिसराच्या सुशोभिकरणासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याअंतर्गत मंदिराचा जीर्णोद्धार, गोदावरी, नासर्डी नदीवर पूल (सांडवा) बांधणे, सभामंडप उभारणे आदिंसह अन्य विकासकामे करण्यात येणार आहेत. याशिवाय वाचनालय, विद्युत रोषणाई ध्वनिव्यवस्था, व्यायामशाळा आदि प्रकल्प हाती घेऊन या तपोभूमीचा आणि तपोस्थानाचा कायापालट करण्यात येणार असल्याचे शिरवाडकर यांनी सांगितले.