पावसाची संततधार

By admin | Published: August 2, 2016 02:22 AM2016-08-02T02:22:59+5:302016-08-02T02:27:26+5:30

पाणी सोडले : जिल्ह्यात पुराचा धोका; नदीकाठी सावधानतेचा इशारा

Sustainable rain | पावसाची संततधार

पावसाची संततधार

Next


नाशिक : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही आपली हजेरी कायम ठेवल्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून, गंगापूर, दारणा व पालखेड या तिन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

सोमवारी दिवसभर पावसाने कमी, अधिक प्रमाणात आपली हजेरी कायम ठेवली. सकाळी ८ वाजेनंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी १ वाजेनंतर पुन्हा संततधार लावली. त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. विशेष करून सायंकाळी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांतून घरी परतणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांची धांदल उडाली, त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. या पावसामुळे रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे गंगापूर धरण क्षेत्रात तसेच धरणाच्या खालच्या बाजूलाही पाऊस कायम असल्याने गोदावरी नदीची पूरपरिस्थिती कायम राहिली, परंतु दिवसभर पावसाची हजेरी लक्षात घेता सायंकाळी पाच वाजता गंगापूर धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. रविवारपासून सुरू असलेल्या २,४६० क्यूसेक पाण्यात एक हजाराने म्हणजेच ३,६४७ इतकी वाढ करण्यात आली, तर दारणा धरणातून ११,६८८ व पालखेडमधून कादवा नदीत ३५० क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धरण, नदी, नाल्यांच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नदीकाठच्या गावांना पुरामुळे बाधा पोहोचू शकते, त्यादृष्टीने सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारीही केली जात आहे.
...इन्फो...
रविवारी (दि.३१) दुपारपासून गंगापूर धरणातून २७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणात सोमवार दुपारपर्यंत एकूण १७३. ४७ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सातत्याने सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरणाचीही पातळी वाढली असून, सोमवारपर्यंत गंगापूर धरणात ४५७५ (८१ टक्के) दलघफू पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

Web Title: Sustainable rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.