सुवर्णा व संदीप वाजेचे टॉवर लोकेशन हायवेवरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 01:52 AM2022-02-14T01:52:45+5:302022-02-14T01:53:03+5:30
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे व त्यांचे पती मुख्य संशयित संदीप वाजे यांचे मोबाइल टॉवर लोकेशन हे २५ जानेवारीच्या रात्री मुंबई - आग्रा महामार्गालगतच होते, यावर तपासातून पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडाचे दररोज नवनवीन पैलू उलगडत असून, वाजे दाम्पत्यामध्ये होणाऱ्या कौटुंबिक कलहामागे केवळ वाजे यास दुसरे लग्न करावयाचे असल्याचे मूळ कारण वाजे यांनी लिहिलेली चिठ्ठी व मोबाइल संवादातून पोलिसांसमोर आले आहे.
नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे व त्यांचे पती मुख्य संशयित संदीप वाजे यांचे मोबाइल टॉवर लोकेशन हे २५ जानेवारीच्या रात्री मुंबई - आग्रा महामार्गालगतच होते, यावर तपासातून पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडाचे दररोज नवनवीन पैलू उलगडत असून, वाजे दाम्पत्यामध्ये होणाऱ्या कौटुंबिक कलहामागे केवळ वाजे यास दुसरे लग्न करावयाचे असल्याचे मूळ कारण वाजे यांनी लिहिलेली चिठ्ठी व मोबाइल संवादातून पोलिसांसमोर आले आहे.
अत्यंत थंड डोक्याने संशयित संदीप याने सुवर्णा वाजेंच्या पूर्वनियोजित खुनाचा कट रचून तो तडीस नेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वाजेच्या मोबाइलमधील डिलीट केलेल्या डेटापैकी काही डेटा ग्रामीण सायबर पोलिसांनी पुन्हा मिळविला आहे. उर्वरित संपूर्ण डेटा फॉरेन्सिककडून जेव्हा प्राप्त हाेईल तेव्हा या हत्याकांडातील आणखी काही पैलू उघड होतील, असे वाडीवऱ्हे पोलिसांचे म्हणणे आहे. मयत सुवर्णा वाजे व संशयित संदीप वाजे यांचे मोबाइल टाॅवर लोकेशन पडताळून बघितले. तांत्रिक विश्लेषणातून त्यांचे टॉवर लोकेशन घटनास्थळाच्या परिसरातील असल्याचे तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाजे याच्या कारमध्ये पोलिसांना आढळलेला भला मोठा चाकूचा वापर सुवर्णा वाजे यांना ठार मारण्यासाठी केला गेला असावा आणि पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये, म्हणून चाकू संशयित संदीप याने स्वत:च्या कारमध्ये दडविला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गौळाणे ते रायगडनगरच्या दरम्यान सुवर्णा वाजे यांचा घातपात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घातपाताचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संशयित त्यांचा मृतदेह कारसह निर्जन ठिकाणी महामार्गालगत पेटवून दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
--इन्फो--
हत्याकांडातील वाजेचे साथीदार कोण?
वाजे हत्याकांडात संशयित त्यांचे पती संदीप वाजेचे अजून कोण साथीदार सहभागी होते? याचा शाेध पोलिसांकडून घेतला जात आहे. याबाबत त्याच्या काही मित्रांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. दोघांवर पोलिसांना संशय जरी असला तरीदेखील अद्याप त्यांच्या सहभागाचे ठोस पुरावे हाती आले नसल्याने या गुन्ह्यात आणखी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
----
रविवारी पुन्हा कुटुंबीयांकडे विचारपूस
ग्रामीण पोलिसांकडून तपासाची गती वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. रविवारी पोलिसांनी पुन्हा सुवर्णा वाजे यांच्या माहेरच्या कुटुंबीयांकडे विचारपूस केली. वाजेंच्या हत्याकांडामधील विविध धागेदोरे पोलिसांकडून जुळविले जात आहे.