सुवर्णा वाजेंचा गळा आवळल्यानंतर चाकूने केले वार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 01:35 AM2022-03-03T01:35:34+5:302022-03-03T01:36:05+5:30
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात त्यांचा पती संशयित संदीप वाजे, त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. म्हस्के याने चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान पोलिसांकडे धक्कादायक खुलासा केला आहे. सुवर्णा वाजेंचा गळा आवळल्यानंतर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृतदेह व कार एका तिसऱ्याच व्यक्तीकडे विल्हेवाट लावण्यासाठी सोपविण्यात आली होती, असे म्हस्के याने पोलिसांना सांगितल्याने, वाडीवऱ्हे पोलिसांनी आता या हत्याकांडातील ‘त्या’ तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात त्यांचा पती संशयित संदीप वाजे, त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. म्हस्के याने चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान पोलिसांकडे धक्कादायक खुलासा केला आहे. सुवर्णा वाजेंचा गळा आवळल्यानंतर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृतदेह व कार एका तिसऱ्याच व्यक्तीकडे विल्हेवाट लावण्यासाठी सोपविण्यात आली होती, असे म्हस्के याने पोलिसांना सांगितल्याने, वाडीवऱ्हे पोलिसांनी आता या हत्याकांडातील ‘त्या’ तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
दुसरे लग्न करायचेय, मात्र सुवर्णा वाजे घटस्फोट देत नाही, म्हणून संशयित संदीप वाजे हा पत्नी सुवर्णा वाजेंचा शारीरिक-मानसिक छळ करीत होता. वेगळे होण्यासाठी सुवर्णा वाजे यांनी ३० लाखांची मागणी संदीप वाजेकडे केली होती. यामुळे वाजे याने म्हस्केसोबत संगनमत करत पत्नी सुवर्णाचा काटा काढण्याचा कट रचला. २५ जानेवारी रोजी रात्री सुवर्णा वाजे यांची संशयित संदीप वाजे व बाळासाहेब म्हस्के यांनी हत्या केल्यानंतर, तिसऱ्या व्यक्तीला मृतदेह कारमध्ये ठेवून सोपविला गेला. कार दुर्घटनेत वाजे यांचा मृत्यू झाल्याचा बनाव दाखविण्यासाठी त्या तिसऱ्या व्यक्तीला सांगण्यात आले होते. विल्हेवाट लावताना त्या व्यक्तीने कारसह वाजेंचा मृतदेह पेटवून नष्ट केला. या रात्री संदीप वाजे, म्हस्के या दोघांच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन हे पोलिसांना कार जाळल्याच्या घटनास्थळापासून जवळपास हायवेवरचे आढळून आले आहे. यामुळे पोलिसांना वाजे व म्हस्केविरुध्द ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच वाजे याच्या कारमधून पोलिसांनी यापूर्वीच भला मोठा रामपुरीसारखा धारदार चाकूही जप्त केला आहे. आता या वाजे हत्याकांडातील तिसऱ्या साथीदाराला शोधून बेड्या ठोकण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
---इन्फो--
म्हस्केला मिळवून दिले होते ८६ लाखाचे कंत्राट
सुवर्णा वाजे यांचा काटा काढण्यासाठी मदत करायच्या अटीवर संशयित संदीप वाजे याने इगतपुरी तालुक्यातील वाळविहिर गावातील एका पुलाच्या बांधकामाचे कंत्राट म्हस्के यास मिळवून दिले होते, अशी माहिती म्हस्केच्या चौकशीत पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर म्हस्के याने वाजेला हत्याकांड करण्यासाठी मदत करत ‘मास्टरमाईंड’ची भूमिका बजावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
---इन्फो--
ॲसिड, सॅनिटायझर अन् पेट्रोलचा वापर
सुवर्णा वाजे यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये ठेवून पेटवून देण्यासाठी संशयित म्हस्के, वाजे यांनी त्या तिसऱ्या व्यक्तीला ॲसिड, सॅनिटायझर आणि पेट्रोलचा पुरवठा केला होता, असेही म्हस्केच्या चौकशीतून पुढे आले आहे. यामुळे कार कोणत्या ज्वलनशील द्रवपदार्थांचा वापर करून पेटविली गेेली, याबाबतचे गूढ उकलले आहे.