सुवर्णा वाजे यांचा त्यांच्या पतीनेच काढला काटा बेड्या : मर्डर मिस्ट्रीह्चा अखेर पोलिसांकडून पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 12:12 AM2022-02-04T00:12:20+5:302022-02-04T00:13:00+5:30
नाशिक : पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलह अन् त्यातून वारंवार उडणारे खटके व वादविवादामुळे मनपाच्या सिडको रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ...
नाशिक : पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलह अन् त्यातून वारंवार उडणारे खटके व वादविवादामुळे मनपाच्या सिडको रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा त्यांचा पती संदीप वाजे यानेच पूर्वनियोजित कट रचून थंड डोक्याने काटा काढला. वाजे ह्यमर्डर मिस्ट्रीह्णचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करण्यास यश मिळविले. गुरुवारी (दि. ३) वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयित वाजे यास बेड्या ठोकल्या. त्याच्यासह अन्य पाच संशयित साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
सिडको येथील मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८, रा. कर्मयोगीनगर) या मंगळवारी (दि. २५) रात्रीपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या पतीने याबाबत मध्यरात्री धाव घेत अंबड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. मात्र, त्याच रात्री महामार्गालगत रायगडनगरजवळ वाजे यांची मोटार जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळल्याने खळबळ उडाली. कारमध्ये काही मानवी हाडेदेखील सापडल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. चेसिस क्रमांकावरून मोटार वाजे यांच्या मालकीची असल्याची खात्री पटविण्यात आली. जळालेली हाडे नेमकी कोणाची, याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता. त्यामुळे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वाडीवऱ्हे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला या अकस्मात गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. गेल्या दहा दिवसांपासून पोलिसांकडून वाजे बेपत्ता की मृत्युमुखी याबाबत पुराव्यांचा शोध घेत जुळवाजुळव केली जात होती. या गुन्ह्यात सुरुवातीपासूनच संशयाची सुई संदीप वाजेकडेच होती. जळालेली हाडे वाजे यांची असल्याचे डीएनए अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर अन्य तांत्रिक पुरावे व वाजे यांच्या माहेरच्या नातेवाइकांच्या जाबजबाबावरून पोलिसांनी संशयित त्यांचा पती संदीप याला अखेर गुरुवारी बेड्या ठोकल्या.
--इन्फो---
थंड डोक्याने रचला कट
संशयित संदीप वाजे याने त्याच्या पत्नीच्या खुनाचा कट हा थंड डोक्याने रचल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कौटुंबिक वादातून आणि संशयावरून खुनाचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. वाजे याने एकट्याने नव्हे तर अन्य पाच ते सहा साथीदारांच्या मदतीने पत्नीचा काटा काढला आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
वाजे मोटार जळीतकांडाच्या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना वेगवेगळ्या पद्धतीने सर्वच कंगोरे तपासावे लागले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या पुराव्यांची पडताळणी करत तपासाला गती दिली गेली; मात्र जळालेली हाडे नेमकी वाजे यांचीच आहेत हे सिद्ध करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे ती फॉरेन्सिककडे डीएनए चाचणीकरिता पाठविण्यात आली. वाजे यांच्या वडिलांचा डीएनए आणि जळालेल्या हाडांचा डीएनए जुळल्यानंतर वाजे बेपत्ता नसून त्यांचा घातपात करत खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात प्रथमदर्शनी संशयाच्या भोवऱ्यात असलेला त्यांचा पती संशयित संदीप वाजेविरुद्ध ठोस पुरावे एकापाठोपाठ एक जुळत गेले आणि पुराव्यांच्या शृंखलेच्या आधारे त्याला गुरुवारी अटक करण्यात आली.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक