‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी, शिवसेनेशी संगत
By admin | Published: February 16, 2017 01:02 AM2017-02-16T01:02:19+5:302017-02-16T01:02:33+5:30
‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी, शिवसेनेशी संगत
नाशिक : राज्याच्या व केंद्राच्या सत्तेत सोबत असलेले एकेक घटक पक्ष भाजपाची साथ सोडत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील एक गट व एक गण वगळता जिल्हा परिषदेच्या ७२ गट व १४५ गणांसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सरकारातील मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरून पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा सुरू असतानाच स्वाभिमानीने शिवसेनेला जवळ करीत भाजपाला दणका दिला आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारातील घटक पक्षांनी या निवडणुकीत भाजपाकडे काही जागा मागितल्या होत्या. त्या न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला होता. तथापि, भाजपाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपा विरुद्ध स्वतंत्र भूमिका जाहीर करण्यात येईल असे हंसराज वडघुले यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या निफाड तालुक्यातील देवगाव जिल्हा परिषद गटातून शिवनाथ जाधव व सिन्नर तालुक्यातील पांगरी गणातून रवींद्र पगार यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व गट व गणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.
यावेळी रतन मटाले, साहेबराव मोरे, रावसाहेब पाटील, नितीन रोटे, नीलेश कुसमोडे, प्रफुल्ल वाघ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)