चौथ्या दिवशीही निफाड येथे स्वाभिमानीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:08 AM2018-10-26T01:08:03+5:302018-10-26T01:09:00+5:30
निफाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन कोणताही निर्णय न झाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होते.
निफाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन कोणताही निर्णय न झाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड तालुक्यातील शेतकºयांच्या प्रश्नाबाबत तसेच रानवड सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत ५१ लाख ५० हजार रुपयांचे वेतन द्यावे या मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या ठिय्या आंदोलनास गुरु वारी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
दरम्यान, साखर आयुक्तालयाचे प्रतिनिधी, विशेष लेखापरीक्षक (साखर) राजेंद्र देशमुख यांनी गुरुवारी पुन्हा भेट घेऊन आंदोलकांशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रानवड साखर कारखान्याच्या निविदा प्रसारित करू असे ढोबळ आश्वासन आंदोलकांना दिले; मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.लेखी हमीची मागणी९ सप्टेंबर रोजी सहकारमंत्री व साखर आयुक्त यांची चर्चा होऊन सहकारमंत्र्यांनी आदेश दिला. या घटनेला दीड महिना झाला; मात्र रानवड कारखान्याची निविदा अद्याप का निघत नाही, असा प्रश्न आहे. जर निविदाच निघाली नाही तर रानवड कारखाना यावर्षी चालू कसा होणार, असा प्रश्न केला जात आहे. हे कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करीत निविदा प्रसारित होण्याची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असे हंसराज वडघुले यांनी सांगितले.