स्वच्छ भारत अभियान : ९४ ग्रामपंचायतींत १८,२६२ शौचालयांची कामे पूर्ण इगतपुरी तालुक्याची स्वच्छतेकडे झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:44 PM2017-12-16T23:44:35+5:302017-12-17T00:20:56+5:30
पंचायत समिती प्रशासनाने केंद्र सरकारची स्वच्छ भारत अभियान योजना वेगाने राबविल्यामुळे इगतपुरी तालुक्याची वाटचाल हगणदारी-मुक्तीकडे सुरू झाली आहे.
इगतपुरी : पंचायत समिती प्रशासनाने केंद्र सरकारची स्वच्छ भारत अभियान योजना वेगाने राबविल्यामुळे इगतपुरी तालुक्याची वाटचाल हगणदारी-मुक्तीकडे सुरू झाली आहे.
संपूर्ण इगतपुरी तालुका हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा सभापती कल्पना हिंदोळे, उपसभापती भगवान आडोळे, गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी संयुक्तपणे शनिवारी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, पाणी व स्वच्छ भारत अभियानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनातून इगतपुरी तालुक्याने स्वच्छतेकडे झेप घेतली आहे. तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींत एकूण १८ हजार २६२ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. पंचायत समितीच्या वतीने शौचालय बांधणाºया लाभार्थींना प्रत्येकी बारा हजार याप्रमाणे तालुक्यात तब्बल तीन कोटी ७९ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. ही संपूर्ण मोहीम यशस्वी झाली असल्याने इगतपुरी तालुक्याची मागास असलेली ओळख संपुष्टात आली आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत संपूर्ण देश हगणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा पुरेपूर फायदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव व त्यांच्या अधिपत्याखालील प्रशासनाने घेतला. मागील पाच वर्षांत तालुक्यात केवळ काही गावे हगणदारीमुक्त झाली होती. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी किरण जाधव यांनी दोन गुडमॉर्निंग पथकाची स्थापना केली होती. त्यामध्ये विस्तार अधिकारी यांच्यासह ग्रामसेवक व पंचायत समितीच्या अनेक कर्मचाºयांचा समावेश होता.
गावोगावी प्रबोधन
अंगणवाडीसेविका व पशुधन अधिकारी यांना गावे वाटून देण्यात त्या त्या गावांत प्रबोधन करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. गटविकास अधिकारी किरण जाधव व गुडमॉर्निंग पथकातील सदस्यांनी प्रत्येक गावात जाऊन हगणदारीमुक्त गावामुळे काय फायदा होतो याविषयी माहिती दिली. तसेच वेळ पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत संपूर्ण इगतपुरी तालुका हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. तांत्रिक अडचणी दूर होताच उर्वरित गावेही हगणदारीमुक्त होतील. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी हे दोनच तालुके हगणदारीमुक्त असून, त्या पाठोपाठ इतर तालुक्यांचा क्र मांक लागत आहे. गुडमॉर्निंग पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी परिश्रम घेतल्याने तालुका लवकरच १०० टक्के हगणदारीमुक्त होणार आहे.