नाशिकमध्ये वसतिगृह न मिळालेल्या शहरातील विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’
By संदीप भालेराव | Published: June 1, 2023 04:54 PM2023-06-01T16:54:17+5:302023-06-01T16:54:42+5:30
विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे.
नाशिक : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी समाजकल्याणकडून ‘स्वाधार’ योजना राबविली जाते. त्याअनुषंगाने नाशिक शहरातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ५१ हजार रुपयांचे लाभ दिले जातात. वसतिगृहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण नाशिकचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे. नाशिक शहरासाठी विद्यार्थ्यांना भोजन भत्ता रुपये २८ हजार, निवास भत्ता रुपये १५ हजार व निर्वाह भत्ता रुपये ८ हजार असे एकूण रुपये ५१ हजार प्रति विद्यार्थी लाभाचे स्वरूप आहे. या रकमेच्या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रूपये ५ हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये २ हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येते.
योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांला इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणमर्यादा ४० टक्के आवश्यक आहे. विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशित नसावा व जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच नाशिक मनपा हद्दीच्या ५ कि.मी. परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण नाशिक कार्यालयात विनामूल्य अर्ज उपलब्ध आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण नाशिक नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, कार्यालयात सादर करावा, असेही सहायक आयुक्त वसावे यांनी कळविले आहे.