फुगा गिळल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:34 AM2017-08-11T00:34:59+5:302017-08-11T00:36:11+5:30
खेळता खेळता तोंडात टाकलेला फुगा गिळल्याने श्वास गुदमरून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. वीर जयस्वाल असे या बाळाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळ दगावल्याच्या धक्क्यातून आई-वडील अद्यापही सावरलेले नाहीत.
सिडको : खेळता खेळता तोंडात टाकलेला फुगा गिळल्याने श्वास गुदमरून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. वीर जयस्वाल असे या बाळाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळ दगावल्याच्या धक्क्यातून आई-वडील अद्यापही सावरलेले नाहीत.
सिडकोतील हनुमान चौक येथे विनोद जयस्वाल हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरात त्यांचे आठ महिन्यांचे बाळ वीर हा खेळत होता. खेळता खेळता त्याने जमिनीवर पडलेला फुगा तोंडात घातला आणि त्याला त्रास होऊ लागला. ही बाब वीरच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यास जवळच्या खासगी दवाखान्यात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याची अवस्था पाहून त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. विनोद जयस्वाल यांनी वीरला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. वीर मृत झाल्याचे कळताच त्याच्या आई-वडिलांना धक्काच बसला. आईने बाळाला कुशीत घेत जोरात हंबरडा फोडला, तर वडिलांना भोवळ आली. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले. त्यांना सावरनेही यावेळी कठीण झाले होते. अवघ्या आठ महिन्यांच्या बाळावर काळाने घाला घातल्याने या घटनेचीच परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. सदर घटना परिसरात कळल्यानंतर नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. गिळलेला फुगा श्वासनलिकेत अडकून श्वास गुदमरल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.